प्राचार्यांची रिक्त पदे तातडीने भरा : महाविद्यालयांना निर्देशनागपूर : राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाशी संलग्नित शेकडो महाविद्यालयांचा कारभार नियमित प्राचार्यांविनाच सुरू आहे. ही बाब वेळोवेळी प्रशासनाच्या निदर्शनास आणून देण्यात आलेली आहे. परंतु कायम विनाअनुदानित तत्त्वावर चालणाऱ्या महाविद्यालयांवर कारवाई करण्यात टाळाटाळ करणाऱ्या प्रशासनाला उच्च शिक्षण संचालकांच्या पत्रामुळे खडबडून जाग आली आहे. प्राचार्यांची रिक्त पदे तातडीने भरण्यात यावीत, या आशयाचे पत्र महाविद्यालयांना पाठविण्यात आले आहे.२०१३ साली एकही नियमित प्राध्यापक नसलेल्या २५० महाविद्यालयांवर प्रवेशबंदी लावण्यात आली होती. यानंतर रिक्त जागांचा मुद्दा ऐरणीवर आला होता. संलग्नित महाविद्यालयांमध्ये प्राचार्यांच्या जागा मोठ्या प्रमाणावर रिक्त आहेत. याबाबत प्राधिकरणांच्या विविध बैठकांमध्ये चर्चा करण्यात आली. या महाविद्यालयांवर कारवाईची मागणीदेखील करण्यात आली. परंतु प्रशासनाने कुठलीही कारवाई न करता मौन साधले.परंतु विधिमंडळ अधिवेशनांमध्ये शैक्षणिक क्षेत्रातील या रिक्त जागांबाबत अनेकदा प्रश्न उपस्थित करण्यात आले. सभागृहांमध्ये सदस्यांनी विद्यापीठांच्या कार्यप्रणालीवर नाराजीदेखील व्यक्त केली व रिक्त पदे तातडीने भरण्याची मागणीदेखील वेळोवेळी केली. अधिवेशनामध्ये रिक्त पदांबाबत वारंवार लक्षवेधी सूचना, तारांकित प्रश्न उपस्थित होत असल्याने उच्च शिक्षण विभागाच्या संचालकांनी याची गंभीर दखल घेतली व ही पदे भरण्याबाबत पावले उचलण्याचे विद्यापीठाला निर्देश दिले. याबाबत ‘बीसीयूडी’ संचालक डॉ.डी.के.अग्रवाल यांनी महाविद्यालयांना पत्र लिहून याची माहिती दिली आहे. शिवाय प्राचार्यांची रिक्त पदे भरणे आवश्यक असून याबाबतची रीतसर प्रक्रिया तातडीने राबविण्याची सूचना केली आहे. (प्रतिनिधी)
संचालकांच्या पत्राने विद्यापीठाला आली जाग
By admin | Published: January 13, 2016 3:46 AM