ब्रिजेश तिवारी
लाेकमत न्यूज नेटवर्क
काेंढाळी : काटाेल व नरखेड तालुक्यासाठी काटाेल येथील प्रशासकीय कार्यालय अतिशय महत्त्वाचे आहे. दाेन्ही तालुक्यातील हजाराे स्त्री-पुरुष नागरिकांची या कार्यालयात दरराेज वर्दळ असते, परंतु गेल्या कित्येक महिन्यांपासून प्रशासकीय कार्यालयाची इमारत घाणीने बरबटलेली असल्याने, नागरिकांना मनस्ताप साेसावा लागत आहे. घाणीमुळे परिसरात दुर्गंधी पसरते. मात्र, संबंधित अधिकाऱ्यांचे त्याकडे दुर्लक्षच हाेत आहे.
काटाेल येथील उपविभागीय महसूल कार्यालय व तहसील कार्यालयाची ब्रिटिशकालीन इमारत ताेडून शासनाने सुसज्ज नवीन प्रशासकीय इमारतीचे बांधकाम केले. या नवीन प्रशासकीय इमारतीत गेल्या दाेन वर्षांपासून काटाेल उपविभागीय महसूल कार्यालय, उपविभागीय पाेलीस अधिकारी, तहसील कार्यालय, तालुका कृषी अधिकारी, उत्पादन शुल्क कार्यालय, नाेंदणी अधिकारी कार्यालय आदी कार्यालय आहेत. या कार्यालयात काटाेल व नरखेड तालुक्यातील नागरिक महत्त्वपूर्ण कामांसाठी येतात, परंतु गेल्या दाेन वर्षांतच प्रशासकीय इमारतीची अत्यंत बिकट अवस्था झाली आहे.
विशेषत: जुन्या ब्रिटिशकालीन इमारतीचीही अशी अवस्था नव्हती. नवीन इमारतीच्या बहुतांश खिडक्या, जिना व भिंती थुंकीच्या पिचकऱ्यांनी रंगल्या आहेत. जिन्याखाली जागाेजागी कचरा व रिकाम्या बाटल्या पडलेल्या आहेत. या इमारतीत नियमित साफसफाई हाेत नसल्याने सर्वत्र घाण व दुर्गंधी पसरते. सर्वात माेठी समस्या म्हणजे या इमारतीतील मुतारी व स्वच्छतागृह गेल्या वर्षभरापासून कुलूपबंद अवस्थेत आहे. केवळ अधिकारी व कर्मचाऱ्यांच्या वापराचे स्वच्छतागृह व मुतारी सुरू आहे. त्यामुळे खेड्यापाड्यातून येणाऱ्या नागरिकांची माेठी गैरसाेय हाेते. एखाद्या कामासाठी कधी संपूर्ण दिवस तर कधी तासन् तास ताटकळत थांबावे लागते. अशा वेळी महिलांची माेठी कुचंबणा हाेते.
...
साफसफाईकडे दुर्लक्ष
या इमारतीत सर्वच विभागाचे कार्यालय आहेत. मात्र, साफसफाईसाठी खर्च करण्यासाठी कुणीही तयार नाही. उपविभागीय महसूल अधिकारी कार्यालय असलेल्या भागात उपविभागीय अधिकारी श्रीकांत उंबरकर हे खर्च करून नियमित साफसफाई करून घेतात, परंतु इमारतीच्या अन्य भागाकडे लक्ष देण्यास कुणीही तयार नाही. याबाबत उपविभागीय अधिकारी श्रीकांत उंबरकर यांच्याशी चर्चा केली असता, सर्व विभागांनी मिळून साफसफाईचा खर्च करणे गरजेचे आहे. वारंवार सूचना देऊनही अन्य विभाग याकडे दुर्लक्ष करीत आहेत. याबाबत लवकरच सर्व विभागाची बैठक घेणार असल्याचे त्यांनी सांगितले.
...
चाैकीदार वा सुरक्षारक्षक नियुक्त करा
या प्रशासकीय इमारतीबाहेर कुणीही चाैकीदार वा सुरक्षारक्षक नसल्याने नागरिक व कर्मचारी मनमर्जीने वाहने उभे करतात. अधिकाऱ्यांची वाहने उभी असलेल्या भागात दुचाकी व इतर चारचाकी वाहने उभी केली जातात. अशा वेळी अधिकाऱ्यांना वाहने काढणे कठीण हाेते, शिवाय नागरिकांनाही त्रास सहन करावा लागताे. त्यामुळे या ठिकाणी वाहन पार्किंगची सुविधा उपलब्ध करून इमारतीबाहेर चाैकीदार नियुक्त करण्याची मागणी नागरिकांकडून केली जात आहे.