-‘ऑन दी स्पॉट’
नागपूर : पहाटेपासून सुरू झालेल्या मुसळधार पावसामुळे गुरुवारी मेडिकलच्या अनेक भागात पाणी शिरल्याने रुग्णसेवा प्रभावित झाली. विशेष म्हणजे, गडर तुंबल्याने बाहेरचे घाणपाणी स्वच्छता गृहातून सर्जरी कॅज्युअल्टीच्या आत आल्याने गोंधळ उडाला. येथील रुग्णांना बाजूच्या वॉर्डात स्थानांतरित करण्याची वेळ आली. शस्त्रक्रिया गृह ‘ई’ व ‘एफ’ मध्येही पावसाचे पाणी शिरले. येथील शस्त्रक्रिया पुढे ढकलाव्या लागल्या तर, वॉर्ड ३५ मध्ये पावसाच्या पाण्यामुळे रुग्णांसह डॉक्टरही भिजले.
मेडिकलमध्ये पावसाचे पाणी शिरण्याची ही पहिली घटना नाही. सलग पाच-सहा तास मुसळधार पाऊस झाल्यास दरवर्षी रुग्णालयात पाणी शिरते. परंतु बांधकाम विभाग याला कधीच गंभीरतेने घेत नसल्याचे चित्र आहे. पावसाळ्यापूर्वी करण्यात येणाऱ्या डागडुजीच्या कामाचा सर्वांनाच विसर पडलेला असतो. घटना झाल्यानंतरही कोण्या अधिकाऱ्याला जाबही विचारला जात नाही. यामुळे रुग्णांसह डॉक्टर व परिचारिकांच्या आरोग्याशी हा खेळ दरवर्षी खेळला जातो, असे बोलले जात आहे.
-पाच रुग्णांना दुसऱ्या वॉर्डात हलविले
मुसळधार पावसामुळे सर्जरी कॅज्युअल्टीच्या मागील भागात असलेली गडर तुंबले. कॅज्युअल्टीच्या स्वच्छतागृहाच्या गडरचे घाणपाणी परत यायला लागले. काही वेळातच संपूर्ण कॅज्युअल्टीत गुडघाभर घाणपाणी साचले. यावेळी पाचवर रुग्ण उपचार घेत होते. पाणी जायला जागा नसल्याने करावे काय, हा प्रश्न होता. डॉक्टर, परिचारिका व कर्मचाऱ्यांनी तातडीने रुग्णांना बाजूच्या वॉर्डात हलविणे सुरू केले. विशेष म्हणजे, आकस्मिक विभागाच्या किरकोळ शस्त्रक्रिया गृहातही पाणी शिरले. सर्वत्र पाणीच पाणी असल्याने रुग्णसेवा प्रभावित झाली होती. मात्र सफाई कर्मचाऱ्यांनी प्रसंगावधान राखून पाणी उपसण्याचे काम केले. यामुळे दुपारनंतर पुन्हा हा विभाग रुग्णसेवेत सुरू होऊ शकला.
-शस्त्रक्रिया गृहातही शिरले पाणी
शल्यक्रिया विभागाच्या शस्त्रक्रिया गृह ‘एफ’मध्ये पावसाचे पाणी शिरले. परंतु सकाळच्या वेळी शस्त्रक्रिया नसल्याने अडचण निर्माण झाली नसल्याचे सांगण्यात येते. अस्थिव्यंगोपचार विभागाच्या शस्त्रक्रिया गृह ‘ई’मध्ये खिडकीतून पाणी आत शिरले. या दोन्ही शस्त्रक्रिया गृहातील नियोजित शस्त्रक्रिया नंतर पुढे ढकलण्यात आल्या.
- वॉर्डही पाण्याखाली
शल्यक्रिया विभागाच्या वॉर्ड क्रमांक ३५ मध्ये भिंतीमधून पावसाचे पाणी शिरू लागल्याने तारांबळ उडाली. रुग्णांच्या खाटाखालून पाणी वाहत होते. बाहेर मुसळधार पाऊस आणि वॉर्डात साचत असलेल्या पाण्यामुळे काही वेळेसाठी भीतीचे वातावरण तयार झाले होते. सफाई कर्मचाऱ्यांनी प्रयत्नांची शिकस्त करून पाणी बाहेर काढले, परंतु यात चार-पाच तासांचा वेळ लागला. वॉर्डात पाणी शिरल्याची ही पहिलीच घटना असल्याचे एका परिचारिकेने सांगितले.
-क्ष-किरण विभागाच्या चुकीचा कामाचा फटका
क्ष-किरण विभागाने सिटी स्कॅनची मोठी विद्युत केबल नालीतून टाकली आहे. चुकीच्या या कामामुळे पावसाचे पाणी पुढे न जाता सर्जरी कॅज्युअल्टीत शिरल्याचे एका सफाई कर्मचाऱ्याने सांगितले. या संदर्भात तक्रारही करण्यात आली. परंतु कुणीच लक्ष दिले नाही. रात्री मुसळधार पाऊस झाल्यास व सर्जरीची मोठी कॅज्युअल्टी आल्यास रुग्णसेवा अडचणीत येण्याची दाट शक्यता आहे.