मद्य तसेच हुक्क्याच्या धुरात झिंगाट - तरुण - तरुणींसह ६७ जण पोलिसांच्या ताब्यात
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर - रामदासपेठेतील तुली इम्पेरियल या तारांकित हॉटेलमध्ये पोलिसांनी छापा मारून मद्य तसेच हुक्क्याच्या धुरात झिंगाट झालेल्या ६७ जणांना ताब्यात घेतले. या कारवाईमुळे संबंधित वर्तुळात प्रचंड खळबळ उडाली आहे. कोरोनाचा प्रादुर्भाव वाढू नये म्हणून पोलिसांनी सर्वच प्रकारच्या हॉटेल, लाउंज आणि पबमधील पार्ट्यांच्या आयोजनाला रात्री ११ वाजेपर्यंतच मुभा दिली होती. त्यानंतर अशा प्रकारचे कुठे आयोजन आढळल्यास कडक कारवाईचेही आदेश दिले होते. पोलिसांचे आदेश झुगारून तुली इम्पेरियलमध्ये मध्यरात्र उलटूनही थर्टी फर्स्टच्या पार्टीच्या नावाखाली धांगडधिंगा सुरू असल्याची माहिती मिळाल्याने गुन्हे शाखेचे उपायुक्त गजानन राजमाने यांनी पहाटे २.३० च्या सुमारास आपल्या सहकाऱ्यांसह तेथे छापा मारला. यावेळी तेथे हुक्क्याचा धूर उडवत झिंगाट झालेल्या ६७ तरुण तरुणी पोलिसांना आढळल्या. बहुतांश धनिकबाळं होती. दरम्यान, पोलीस हॉटेलमध्ये धडकल्याचे पाहून संबंधितांमध्ये एकच खळबळ उडाली. त्यांनी आरडाओरड सुरू केली. धावपळ वाढल्याने पोलिसांनी सर्वांना शांत करीत ताब्यात घेतले. या सर्वांचे मेडिकल करण्याचा पोलिसांनी निर्णय घेतल्याने त्यातील अनेकांनी फोनोफ्रेण्ड सुरू केले. पोलिसांनीही कायदेशीर कारवाईचा पवित्रा घेत साऱ्यांनाच गप्प केले. पहाटेपर्यंत कारवाईची प्रक्रिया राबवून नंतर त्या ६७ जणांना सूचनापत्र देत सोडून देण्यात आले.