दयानंद पाईकराव।लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : गणेशपेठ बसस्थानकाच्या विश्रांतीगृहात विदर्भासह महाराष्ट्रातून चालक-वाहक मुक्कामी असतात. परंतु डासांच्या उपद्रवामुळे त्यांना झोप लागत नाही. येथे दुर्गंधी पसरल्यामुळे त्यांना नाकाला रुमाल बांधून कसेबसे झोपावे लागते. प्रसाधनगृहात दरवाजा नाही, बेसिन चोक झाल्यामुळे पाणी साचलेले, अशा एक ना अनेक समस्यांचा सामना त्यांना करावा लागतो. रात्री झोप झालेली नसताना दुसऱ्या दिवशी सकाळीच उठून चालकाला स्टेअरिंगवर बसावे लागते. त्यामुळे विश्रांतीगृहातील समस्या कधी दूर होणार, असा प्रश्न येथील चालक-वाहकांनी उपस्थित केला.नागपुरातील गणेशपेठ बसस्थानकावरील विश्रांतीगृहातील सोईसुविधांचा ‘लोकमत’ने आढावा घेतला असता येथे उपस्थित चालक-वाहकांनी समस्यांचा पाढाच वाचला. येथे गैरसोयींचा सामना करावा लागत आहे. विश्रांतीगृहात पूर्वी चालक-वाहकांसाठी पलंग, गाद्या राहत. परंतु अलीकडील काळात एसटी महामंडळाने साधी सतरंजी टाकलेली दिसली नाही. कर्मचारी घरून आणलेली चादर टाकून त्यावर विश्रांती घेतात. विश्रामगृहाला लागूनच बाथरुम, शौचालय आहे. येथे नियमित सफाई होत नसल्यामुळे कमालीची दुर्गंधी पसरलेली दिसली. बाथरुमचे दारही नादुरुस्त असल्यामुळे ते उघडेच ठेवून अंघोळ करावी लागते. दुर्गंधीमुळे रात्रभर कर्मचाऱ्यांना डासांचा त्रास होतो. विश्रांतीगृहाच्या कोपऱ्यात कचरा साठलेला दिसला. बेसिन चोक झाल्यामुळे त्यात पाणी तुडुंब भरलेले होते. वॉटर कुलरजवळही कमालीची घाण पसरल्यामुळे तेथे पाणी पिण्याचे सोडा हात धुण्याचीही इच्छा होत नसल्याचे कर्मचाऱ्यांनी सांगितले. अनेक कर्मचारी ड्युटीवर निघताना आपल्या घरून दोन-तीन पाण्याच्या बॉटल घेऊन येतात. शौचालयात पाण्याचा पाईप फुटल्यामुळे पाणी अंगावर पडते. अशा परिस्थितीत येथे रात्र काढण्याची पाळी चालक-वाहकांवर येत आहे. नाईलाजास्तव रात्रभर येथे थांबून चालक-वाहक दुसऱ्या दिवशी सकाळीच उठून बस घेऊन जातात. त्यामुळे विश्रांतीगृहातील समस्या दूर करून तेथे सोईसुविधा उपलब्ध करून देण्याची मागणी चालक-वाहकांनी केली.विश्रांतीगृहात चोरीच्या घटनारात्री मुक्कामी बस घेऊन आल्यानंतर वाहकांजवळ दिवसभरात प्रवाशांकडून आलेली रक्कम राहते. परंतु येथे सुरक्षेची कोणतीच सुविधा नसल्यामुळे अनेकदा येथे चोरीच्या घटना घडत असल्याची माहिती कर्मचाऱ्यांनी दिली. पूूर्वी एसटीच्या प्रशासनातर्फे येथे आलेल्या चालक-वाहकांची नोंद करण्यासाठी एक कर्मचारी नियुक्त करण्यात येत होता. परंतु तो कर्मचारीही आता दिसत नसल्यामुळे कुणीही येऊन येथे विश्रांती करीत असल्याचे कर्मचाऱ्यांनी सांगितले.
नागपूर बसस्थानकाचे विश्रामगृह की गलिच्छ उकिरडा?; चालक-वाहक त्रस्त
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 13, 2018 11:13 AM
गणेशपेठ बसस्थानकाच्या विश्रांतीगृहात विदर्भासह महाराष्ट्रातून चालक-वाहक मुक्कामी असतात. परंतु डासांच्या उपद्रवामुळे त्यांना झोप लागत नाही. येथे दुर्गंधी पसरल्यामुळे त्यांना नाकाला रुमाल बांधून कसेबसे झोपावे लागते.
ठळक मुद्देअर्धवट झोपेमुळे अपघाताची शक्यता दुर्गंधीचे साम्राज्य, समस्या सोडविणार कोण?