नागपूर : सेल्युलर जेलच्या कारागृहात सावरकरांनी ज्या यातना भाेगल्या, तशा त्यावेळच्या काेणत्याही राजकीय नेत्यांनी भाेगल्या नाही. तेसुद्धा या देशासाठी लढले आहेत. तुम्ही गांधीवादी विचारधारेचे आहात व सावरकर हिंदुत्ववादी विचारधारेचे हाेते. केवळ विचारधारा वेगळी आहे म्हणून स्वातंत्र्यवीर सावरकरांवर खाेट्या आराेपांचे गलिच्छ राजकारण हाेत असल्याची टीका चित्रपट अभिनेता व सावरकरांचे अभ्यासक शरद पाेंक्षे यांनी केली.
सावरकर आत्मार्पण दिनाचे औचित्य साधून संवेदना परिवार संस्था आणि दि ब्लाइंड रिलिफ असाेसिएशन यांच्या संयुक्त विद्यमाने ‘स्वातंत्र्यवीर वि. दा. सावरकर : आक्षेप आणि खंडन’ या विषयावर पाेंक्षे यांचे व्याख्यान आयाेजित करण्यात आले. याप्रसंगी उद्याेजक निखिल तारकुंडे, निखिल गडकरी व मकरंद पांढरीपांडे प्रामुख्याने उपस्थित हाेते. शरद पाेंक्षे म्हणाले, सावरकरांनी कधी माफी मागितली नाही. ते ब्रिटेनमध्ये बॅरिस्टर हाेते व तेथील कायद्यांचा त्यांना दांडगा अभ्यास हाेता. त्या कायद्याच्या तरतुदीत त्यांनी ब्रिटिश सरकारला दयेचा अर्ज केला. आपला देह ५० वर्षे कारागृहात वाया जाण्यापेक्षा देशाचे स्वातंत्र्य आणि हिंदू राष्ट्राच्या निर्मितीसाठी खर्ची व्हावा, हा उद्देश ठेवून स्वातंत्र्यवीर सावरकरांनी ब्रिटिश सरकारला दयेचे अर्ज केले हाेते. त्यांनी कधीही हिंदुत्वाशी तडजाेड केली नाही. ते शंभर टक्के हिंदुत्ववादी हाेते म्हणूनच त्यांना सातत्याने टार्गेट केले जाते, अशी टीका पाेंक्षे यांनी केली. माेदी-शहा सावरकरांना भारतरत्न देऊ शकले असते; पण त्यांनाही विचार करावा लागताे, अशी खंत त्यांनी व्यक्त केली.
खुद्द महात्मा गांधी यांनी सावरकरांचे काैतुक केले आहे, इंदिरा गांधी यांनी सावरकरांवर पहिले टपाल तिकीट काढले आहे, हा इतिहास आजच्या गांधीला का माहिती नाही, अशी टीका शरद पाेंक्षे यांनी केली. त्यांनी यावेळी राजकीय आराेपही केले.