नरेश डोंगरे
नागपूर : तिचे उत्तान, आकर्षक प्रोफाईल बघून अनेकजण अतिसुंदर, गॉरजियस, ऑसम, लाजवाब, खुबसूरत आणि अशाच आशयाच्या कमेंट टाकतात. या कमेंटच त्यांना तिच्या मायाजालमध्ये अडकवतात अन् नंतर अनेकजण नको ती चूक करून घेत थेट उद्ध्वस्ततेकडे जाणाऱ्या मार्गावर जाऊन बसतात.
होय, हे खरे आहे. सेक्सटॉर्शन करणारी टोळी आता देशभरात हैदोस घालत आहे. दरदिवशी अनेकांवर जाळे फेकून त्यात अडकलेल्यांची आर्थिक आणि मानसिक पिळवणूक करीत आहे. या टोळीच्या जाळ्यात अडकलेल्या अनेकांनी स्वत:ची आणि नातेवाइकांची रक्कम तसेच माैल्यवान चीजवस्तू गमावल्या आहेत, तर काहींनी आत्महत्या केली आहे. काही दिवसांपूर्वी पुण्यात दोन तरुणांनी या टोळीच्या जाचाला कंटाळून आत्महत्या केली होती, हे विशेष !
सायबर गुन्हेगारीत सक्रिय असलेल्या अनेक टोळ्या वेगवेगळ्या क्लृप्त्या वापरतात. सेक्सटॉर्शनचेही त्यांचे वेगवेगळे फंडे आहेत. त्यातील एक म्हणजे, या टोळ्यातील गुन्हेगार दरदिवशी देशभरातील शेकडो तरुण-तरुणींचे फेसबुक, इन्स्टाप्रोफाईल चेक करतात. या टोळीतील आकर्षक, उत्तान फोटो असलेल्या तरुणीची तरुणांना, पुरुषांना फ्रेंड रिक्वेस्ट येते, तर तरुणी, महिलांना आकर्षक तरुण, पुरुषाची फ्रेंड रिक्वेस्ट येते. ती मान्य झाली तर ठीक, अन्यथा तुम्हाला मेसेंजरवर हाय, हेलो डीयर म्हणून मेसेज येतो. नंतर कसे आहात, काय करता, कुठे राहता, असे विचारले जाते.
तिचे-त्याचे आकर्षक प्रोफाईल बघून त्याला सहज प्रतिसाद दिला (किंवा नाही दिला तरी) तुम्हाला रोमँटिक मेसेज, पोर्न फोटो, व्हिडीओ येतो आणि नंतर ती थेट 'सेक्स व्हिडीओ कॉल'ची ऑफर देते. फसवणुकीची ही पहिली पायरी असते. त्याला प्रतिसाद दिला तर सेक्सटॉर्शनची टोळी चालविणारे गुन्हेगार तुमची वाट लावण्यात कसलीही कसर सोडत नाही. त्यांच्याकडून मिळणारा प्रचंड मानसिक त्रास आणि होणारी आर्थिक पिळवणूक पीडित व्यक्तीला कोणत्याही वळणावर जाण्यासाठी बाध्य करते.
आहे ते साहित्यही विकून पाठवतात रक्कम
आपला नको त्या अवस्थेतील व्हिडीओ आपल्यालाच पाठवून ही टोळी नंतर तो व्हायरल करण्याची धमकी देते. बदनामी टाळायची असेल तर अमुक एवढी रक्कम आमच्या खात्यात जमा करा, असे सांगते. त्यामुळे या टोळीच्या कचाट्यात अडकलेली महिला असो किंवा पुरुष त्यांची वेळोवेळी पैशाची मागणी पूर्ण करतो. वारंवार पैसे देणे शक्य नसल्याने काहीजण कुटुंबीयांपासून लपून स्वत:चेच सामान विकून आरोपींना रक्कम पाठवतो. कुटुंबीयांनी त्या चीजवस्तूबद्दल विचारणा केल्यास हरविली, मित्राने नेली असे सांगून वेळ मारून नेतो.
ती बोलावते मात्र जायचे नाही !
सेक्सटॉर्शनच्या जाळ्यात अडकायचे नसेल अन् आपली फसवणूक करून घ्यायची नसेल तर सिम्पल फंडा आहे. महिला कितीही आकर्षक असली अन् तिने कोणतीही ऑफर दिली तर त्याला बळी पडायचे नाही. तिला कमेंटही करायचे नाही. थोडक्यात तिने कितीही आग्रह केला तरी व्हिडीओ कॉलवर जायचे नाही आणि तिने म्हटल्याप्रमाणे वागायचे नाही, अन्यथा भयंकर मनस्तापाला सामोरे जावे लागेल, असे सायबर एक्सपर्ट म्हणतात.