नागरिकांचे आरोग्य धोक्यात : तक्रारी करून त्रस्त नागरिक थकले
गणेश हूड
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : उपराजधानीची स्मार्ट सिटीकडे वाटचाल सुरू असल्याचा दावा केला जात आहे. दुसरीकडे ब्रिटिशकालीन ट्रंक लाईन व ५० ते ६० वर्षापूर्वीच्या सिवरेज लाईन नादुरुस्त झाल्या आहेत. यामुळे शहरातील सर्वच भागातील नागरिक त्रस्त आहेत. अनेकांच्या घरात घाण पाणी साचत असल्याने आरोग्य धोक्यात आले आहे. दुसरीकडे महापालिकेचा प्रस्तावित ११५० कोटींचा साऊथ झोन सिवरेज प्रकल्प केंद्र सरकारकडे मंजुरीच्या प्रतीक्षेत अडकला आहे.
साऊथ झोन सिवरेज प्रकल्पात शहरातील ६०० किलोमीटर लांबीच्या मलनिस्सारण वाहिन्यांचे जाळे व एसटीपीचे जाळे निर्माण केले जाणार आहे. ११५० कोटींच्या या प्रकल्पासाठी २०२०-२१ या वर्षात तत्कालीन आयुक्तांनी १७९.११ कोटी प्रस्तावित केले होते. परंतु या प्रकल्पाला अजूनही मंजुरी मिळालेली नाही. सिवरेजमुळे त्रस्त नागरिक झोन कार्यालयाकडे तक्रारी करतात. परंतु लाईनच बदलायच्या असल्याने दुरुस्तीतून समस्या सुटत नाही. यामुळे प्रशासनाचाही नाईलाज आहे.
नागपूर शहराला दररोज ६५० ते ७०० एमएलडी पाणीपुरवठा होतो तर ५२५ एमएलडी सांडपाणी निर्माण होते. त्यातील ३५० एमएलडी सांडपाण्यावर पाण्यावर प्रक्रिया केली जाते. उर्वरित सांडपाण्यावर प्रक्रिया करण्यासाठी शहरात उत्तर, मध्य व दक्षिण झोन अंतर्गत प्रकल्प उभारण्यासाठी ३५०० कोटींची गरज आहे.
...
नागनदी प्रकल्पाला सुरुवात कधी?
३५०० कोटींच्या प्रकल्पापैकी २११७.५४ कोटींच्या नाग नदी पुनरुज्जीवन प्रकल्पाला केंद्राने मान्यता दिली आहे. केंद्राच्या एक्सपेंडिचर फायनान्स कमिटीच्या मान्यतेनंतर मंत्रिमंडळाची मंजुरी मिळाल्यानंतर या प्रकल्पाचे काम सुरू होईल. यात केंद्र सरकार ६० टक्के, राज्य सरकार २५ टक्के तर मनपाला १५ टक्के वाटा उचलावयाचा आहे. यातून शहरात उत्तर, मध्य भागतील एसटीपी आणि सिवरेज नेटवर्क प्रस्तावित आहे. या प्रकल्पामुळे नागनदीला गतवैभव प्राप्त होणार आहे.
...
३१ कोटीच्या प्रकल्पाने समस्या सुटणार नाही
शहरातील दहा झोनला विभाजित करून उत्तर, मध्य आणि दक्षिण असे तीन सिवरेज झोन तयार केले आहे. सिवरेज लाईन व चेंबर दुरुस्तीच्या ३१ कोटी ३० लाख २९ हजार ८६८ रुपयांच्या प्रकल्पांचे काम हाती घेतले आहे. परंतु शहरातील सिवरेज लाईन ५० ते ६० वर्षापूर्वीच्या असल्याने लाईन बदलण्याची गरज असल्याने सिवरेज व चेंबर दुरुस्तीने हा प्रश्न सुटणार नाही.
..................
केंद्र सरकाकडे प्रस्ताव पाठविला
११५० कोटींच्या साऊथ झोन सिवरेज प्रकल्पाचा प्रस्ताव केंद्र सरकारकडे मंजुरीसाठी पाठविला आहे. यात शहरातील ६०० किलोमीटर लांबीच्या मलनिस्सारण वाहिन्यांचे जाळे व एसटीपीचे जाळे निर्माण केले जाणार आहे.
श्वेता बॅनर्जी अधीक्षक अभियंता, जलप्रदाय
...
शहरातील सिवरेज लाईन -३५०० कि.मी.
नादुरुस्त सिवरेज लाईन -२०२५ कि.मी.
नॉर्थ, सेंट्रल झोन -१३४२ कि.मी.
साऊ थ झोन -६६२.५० कि.मी.