नागपूर : विधिमंडळाच्या हिवाळी अधिवेशनादरम्यान दिलेल्या आश्वासनानुसार दिव्यांगांच्या विविध मागण्यासंदर्भात महापालिका व जिल्हा प्रशासनातील व वरिष्ठ अधिकाऱ्यांची अद्याप बैठक आयोजित करण्यात आलेली नाही. यामुळे संतप्त दिव्यांगांनी सोमवारी जिल्हा परिषदेतील जिल्हा समाजकल्याण अधिकारी किशोर भोयर यांच्या कार्यालयाला कुलूप ठोकले. यामुळे जिल्हा परिषदेत काहीवेळ खळबळ उडाली होती.
अधिवेशनादरम्यान वरिष्ठांच्या सूचनेनुसार किशोर भोयर यांनी दिव्यांगांच्या शिष्टंमडळाला महापालिका व जिल्हा प्रशासनासनातील वरिष्ठ अधिकाऱ्यांना बैठक घेण्यासंदर्भात विनंती करून दिव्यांगांच्या मागण्या मार्गी लावण्याचे आश्वासन भोयर यांनी दिले होते. या संदर्भात काही दिवसापूर्वी भोयर यांना स्मरण पत्र देण्यात आले होते. मात्र त्यानंतरही भोयर यांनी अद्याप मनपा व जिल्हा प्रशासनातील अधिकाऱ्यांची बैठक घडवून आणलेली नाही. याकडे लक्ष वेधण्यासाठी जिल्हा समाजकल्याण अधिकारी यांच्या कार्यालयाला कुलूप ठोकल्याची माहीती आंदोलकांनी दिली.
आंदोलनात आशीष आमदरे, इरफान खान, मनोज राऊळ. गिरधर भजभुजे, राजेश खारेकर, गजानन काळे, उमेश गणवीर कल्पना नंदीपाटील आदींचा समावेश होता. सीईओ सौम्या शर्मा यांच्या मध्यस्थिनंतर आंदोलकांनी कुलूप उघडले. आश्वासनानुसाार दिव्यांगांना न्याय न मिळाल्यास तीव्र आंदोलनाचा इशारा आंदोलकांनी यावेळी दिला.