मंगेश व्यवहारेनागपूर : लाडक्या बहिणीच्या धर्तीवर दिव्यांगाना महिन्याकाठी ६ हजार रुपये आर्थिक सहाय्य करण्यात यावे, अशी मागणी करत विदर्भ विकलांग संघर्ष समितीद्वारे बुधवारी विधानभवनाच्या मुख्य प्रवेशद्वारापुढे जोरादार आंदोलन केले.
समितीद्वारे गेल्या काही वर्षांपासून सातत्याने दिव्यांगांच्या विविध समस्या मांडण्यात येत आहे. विधीमंडळाच्या हिवाळी अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी समितीने मोर्चादेखील काढला होता. त्या मोर्चामुळे काही काळ तणाव निर्माण झाला होता. मोर्चादरम्यान प्रशासनाकडून त्यांना कुठलाही सकारात्मक प्रतिसाद मिळाला नाही. परिणामत: त्यांनी बुधवारी थेट विधानभवनाच्या मुख्य प्रवेशद्वारापुढे येत आंदोलन पुकारले. यामध्ये त्यांनी महिन्याकाठी सहा हजार रुपये आर्थिक सहाय्य करण्याची मागणी लावून धरली. याशिवाय दिव्यांगांना व्यवसायासाठी अर्थसाहाय्य देण्याचा योजनेतील ४५ वर्षे अट रद्द करण्यात यावी. हा लाभ दर तीन वर्षांनी देण्यात यावा. अर्थसहाय्याची राशी एकमुश्त ई-रिक्षाच्या किमतीएवढी किंवा किमान २ लाख देण्यात यावी, प्रत्येक शहर बस स्टॉपच्या बाजूला किमान ६४८ स्क्वेअरफूटचे अस्थायी व्यवसाय स्टॉल दिव्यांगाकरीता बनवून देण्यात यावे, दिव्यांगानी बनविलेल्या स्टॉलला मान्यता देण्यात यावी, शासन निर्णयाप्रमाणे अर्ज करणाऱ्या व पूर्ण कागदपत्राची पूर्तता करणाऱ्या दिव्यांगांना व्यवसायासाठी २०० स्क्वेअरफूट जागा त्वरीत देण्यात यावी, दिव्यांगांच्या नावे असलेल्या घराला किंवा दिव्यांग राहत असलेल्या घराला घरटॅक्स / मालमत्ता कर व पाण्याच्या बिलामध्ये पन्नास टक्के सवलत देण्यात यावी, प्रत्येक सरकारी हॉस्पिटल, कार्यालय, रेल्वे स्टेशन, मेट्रो स्टेशन, बस स्टॉप जवळ फक्त दिव्यांग ई-रिक्षाकरीता ऑटोरिक्षा स्टॅण्डप्रमाणे पार्कींग सुविधा करावी, प्रत्येक जिल्हा, तालुका, ग्रामपंचायत, मनपा स्तरावर दिव्यांगाची शंभर टक्के शिरगिनती करण्यात यावी.
शिरगिनतीमध्ये नाव, पत्ता, वय, शिक्षण, रोजगार, व्यवसाय घेत असलेल्या शासकीय योजना इत्यादीबाबत माहिती घेऊन सरकारी धोरण निर्धारीत करावे, समाजकल्याण येथील बिजभांडवल योजनेची कर्जमर्यादा पाच लाख करण्यात यावी, दिव्यांगांना विवाह प्रोत्साहन राशी म्हणून २ लाख ५० हजार देण्यात यावे, आदी मागण्यांकडे लक्ष वेधण्यात आले. यावेळी आंदोलनात समितीचे विदर्भ अध्यक्ष गिरीधर भजभुजे, विदर्भ विकलांग ई-रिक्षा संघटनेचे अध्यक्ष आशिष आमदरे, इरफान खान, राजन सिंग, मनोज राऊळ, उमेश गणवीर, नरेंद्र सोनडवले आदींचा सहभाग होता.
चौकट... राम कदमांची मध्यस्थीविधानभवनाच्या मुख्य प्रवेश्द्वारापुढे सुरू असलेले दिव्यांगांचे आंदोलन लक्षात घेत भाजपचे आमदार राम कदम यांनी मध्यस्थी केली. त्यांनी दिव्यांगांचे निवेदन स्वीकारत यावर सकारात्मक चर्चा करण्यात येईल. सरकार सगळ्यांचे काम करण्यासाठी आहे. दिव्यांगाचे मुद्दे निकाली काढण्यात येतील, असे आश्वासन दिले.