संस्था चालकांच्या बैठकीत आंदोलनाचा इशारा
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : नागपूर जिल्ह्यातील दिव्यांग शाळा व कर्मशाळांचे १७ कोटींचे वेतनेत्तर अनुदान थकले आहे. यामुळे या शाळा आर्थिक संकटात आहेत. राज्य सरकारने तातडीने अनुदान द्यावे, अन्यथा या विरोधात आंदोलन करण्याचा इशारा रविभवन येथे पार पडलेल्या संस्था चालक व कर्मचारी संघटनांच्या बैठकीत देण्यात आला.
दिव्यांग शाळा, कर्मशाळा व कर्मचाऱ्यांच्या विविध समस्या संदर्भात ही बैठक घेण्यात आली. जिल्ह्यातील ४० संस्थांचे प्रतिनिधी उपस्थित होते. सेवायोग मंद शाळेचे संचालक पद्माकर दिघे अध्यक्षस्थानी होते. प्रमुख पाहुणे म्हणून डी.डी. सोनटक्के, नानाजी समर्थ, दिलीप धोटे, तुळशीरात अतकर, किशोर मुसळे, डॉ. अरुण पांडे, राज कापसे, गुलाबराव दुल्लरवार, किसत चहांदे, शुभदा आंबेकर, गिरीश वºहाडपांडे, अशोक दांडेकर, कायंदे, खोकले आदी उपस्थित होते.
संघटनेचे अध्यक्ष डी.डी. सोनटक्के यांनी थकीत वेतनेत्तर अनुदान राज्य सरकारने तातडीने द्यावे, समाजकल्याण विभागाने प्रलंबित कामे निकाली काढावी, मूल्य निर्धारणाची प्रक्रिया वेळेत व्हावी, सातवा वेतन आयोग, सुधारित वेतन श्रेणी,१२३ शाळांचे प्रश्नासंदर्भात संस्थाचालकांनी दिव्यांग कल्याण आयुक्त, जि.प.चे मुख्य कार्यकारी अधिकारी यांना निवेदन दिल्याची माहिती दिली.
प्रश्न मार्गी लावण्यासाठी सर्व संस्था चालकांनी एकत्र येऊन आंदोलन, उपोषण करण्याचा इशारा दिला. पद्माकर दिघे, किशोर मुसळे यांनी मार्गदर्शन केले. राहुल सोनटक्के, प्रमोद पाचपोर, सुषमा रंगारी,भूषण ठोंबरे, उत्तम सावरकर, मालू क्षीरसागर, राजेश खांडेकर, कैलास बोकर आदी उपस्थित होेते.
...
अशा आहेत प्रमुख मागण्या
राज्य सरकारने थकीत वेतनेतर अनुदान द्यावे
समाज कल्याण विभागाने प्रलंबित कामे निकाली काढावी.
सुधारित वेतनश्रेणी लागू करावी.
१२३ शाळांचे प्रश्न निकाली काढावे,
सातवा वेतन आयोग लागू करावा.