मंगेश व्यवहारे, नागपूर : सप्टेंबर २०२३ मध्ये पावसाचे भयावह चित्र नागपूरकरांनी अनुभवले. त्यानंतर महापालिका प्रशासनाने आपत्ती व्यवस्थापन यंत्रणा सक्षम करण्याचा निर्णय घेतला. यंदा मान्सूनच्या काळात येणाऱ्या आपत्तीचा निपटारा करण्यासाठी अग्निशमन विभाग सक्रीय झाला आहे. अग्निशमन केंद्राबरोबर झोन कार्यालयातही नियंत्रण कक्ष सुरू झाले आहे. २४ तास सक्रीय असणारे २७ जणांचे आपत्ती व्यवस्थापन पथक तयार आहे. त्याचबरोबर पोहणाऱ्या २५ लोकांची टीम ही गठित करण्यात आली आहे.
दरवर्षी १ जून ते ३० सप्टेंबर काळात आयुक्तांच्या निर्देशानुसार नियंत्रण कक्ष स्थापन करण्यात येतो. आयुक्त डॉ. अभिजित चौधरी यांनी यावेळी झोननिहाय नियंत्रण कक्ष कार्यान्वित करण्याचे निर्देश दिले होते. त्यानुसार अग्निशमन विभागाने नियोजन केले आहे. पावसाळ्यात अतिवृष्टी झाल्यास, पूर आल्यास बचावासाठी अग्निशमन विभाग कार्यरत असतो. यंदा शहरा आपत्ती व्यवस्थापन टीमचे नेतृत्व उपअग्निशमन अधिकारी सतीश रहाटे करणार आहे. त्यांच्यासोबत उपअग्निशमन अधिकारी रवींद्र मरसकोल्हे, प्रकाश कावडकर, वरिष्ठ लिपिक अरुण भोपळे, अग्निशमन विमोचक राजेश वानखेडे यांच्यासह अन्य जवानांचा समावेश आहे.
या पथकाचा एक ग्रुप तयार करण्यात आला आहे. जो शहरातील कुठल्याही भागात निर्माण झालेल्या आपत्तीला तत्काळ प्रतिसाद देईल. त्याचबरोबर संबंधित एरीयातील अग्निशमन केंद्रातील जवान देखील बचाव कार्यात सहभागी होईल. २३ सप्टेंबर २०२३ ला आलेल्या पूरातून अग्निशमन विभागाच्या जवानांनी ५०० ते ६०० लोकांना सुरक्षित बाहेर काढले होते.
- आपत्तीचा सामना करायला विभाग सक्षम
मुख्य अग्निशमन अधिकारी बी.पी. चंदनखेडे म्हणाले की शहर आपत्ती व्यवस्थापन पथकात पट्टीच्या पोहणाऱ्यांची टीमही तयार करण्यात आली आहे. प्रत्येक केंद्राला अग्निशमन विभागाने दिशानिर्देश दिलेले आहे. आयुक्तांच्या निर्देशानुसार झोननिहाय आपत्ती व्यवस्थापन कक्ष स्थापन करण्यात आला आहे. कुठल्याही प्रकराच्या आपत्तीशी निपटायला विभाग तत्पर आहे.