योगेश पांडेलोकमत न्यूज नेटवर्कनागपूर: भूकंप, चक्रीवादळ, पूर यांसारख्या विविध नैसर्गिक आपत्तींच्या तडाख्याने दरवर्षी राज्यात कोट्यवधी रुपयांचे नुकसान होते व अनेकदा वेळेत मदत न मिळाल्याने जिवीतहानीदेखील होते. मात्र, केंद्र शासनाच्या राष्ट्रीय आपत्ती व्यवस्थापन संस्थेच्या धर्तीवर राज्य आपत्ती व्यवस्थापन संस्थेची स्थापना होणार असल्याच्या निर्णयाने राज्याला आपत्ती व्यवस्थापन क्षेत्रात दिशा मिळणार आहे. दिल्लीतील केंद्रीय संस्थेप्रमाणेच मध्य प्रदेश, गुजरात या राज्यांप्रमाणे महाराष्ट्रातील आपत्ती व्यवस्थापनालादेखील बळ मिळणार असल्याचीच चिन्हे आहेत.
केंद्राने आपत्ती व्यवस्थापन प्रभावी व्हावे, यासाठी 'आययूआयएनडीआरआर'ची (इंडिया युनिव्हर्सिटीज अंड इन्स्टिट्यूटशन्स नेटवर्क) स्थापना केली आहे. यात देशपातळीवर आपत्ती व्यवस्थापनाचे अभ्यासक्रम चालविणारी विविध विद्यापीठे, तसेच संस्था समाविष्ट आहेत.
देशातील जवळपास २७ विद्यापीठे आपत्ती व्यवस्थापनात सक्रियपणे सहभागी आहेत. तर सुमारे १०,०११ स्वतंत्र संस्था क्षमता बांधणी आणि संशोधनात गुंतलेल्या आहेत. तर, राष्ट्रीय पातळीवरील २३ संस्था विविध स्तरांवर आपत्ती व्यवस्थापन अभ्यासक्रम चालवतात.
पंतप्रधानांच्या १० सूत्री अजेंड्यानुसार स्थापनाविविध प्रकारच्या आपत्तींमध्ये जोखीम कमी करण्यासंदर्भात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी १० सूत्री अजेंडा दिला होता. यातील सहाव्या अजेंड्यानुसार भारतातील आपत्ती समस्यांवर काम करण्यासाठी विद्यापीठांचे जाळे विकसित करण्याची आवश्यकता असल्याचे स्पष्ट करण्यात आले होते. तसेच प्रादेशिक पातळीवर यावर जास्त नियोजनावर भर देण्यात आला होता. महाराष्ट्र सरकारने नागपुरातील संस्थेला मान्यता देत पंतप्रधानांच्या अजेंड्याचे पालन केले आहे.
या राज्यांतदेखील आपत्ती व्यवस्थापन केंद्र-संस्था-अभ्यासक्रम
- उत्तराखंड : आयआयटी रुडकी सेंटर ऑफ एक्सेलन्स इन डिझास्टर मिटीगेशन अॅन्ड मॅनेजमेन्ट
- गुजरात : गुजरात इन्स्टिट्यूट ऑफ डिझास्टर मॅनेजमेन्ट, गांधीनगर
- आसाम : आयआयटी गुवाहाटी: सेंटर फॉर डिझास्टर मॅनेजमेन्ट अँड रिसर्च
- मध्य प्रदेश: आपत्ती व्यवस्थापन संस्था, भोपाळ अंदमान निकोबार : पाँडिचेरी विद्यापीठ, डिपार्टमेंट ऑफ कोस्टर डिझास्टर मॅनेजमेन्ट
- कर्नाटक : मणिपाल अॅकेडमी सेंटर फॉर डिझास्टर मॅनेजमेन्ट
- बिहार : डीएमआय : सेंटर ऑफ एक्सेलन्स इन डिझास्टर मॅनेजमेन्ट
- तामिळनाडू: अन्ना विद्यापीठ: सेंटर फॉर क्लायमेट चेंज अॅन्ड डिझास्टर मॅनेजमेन्ट