नागपूर : हवामान खात्याच्या अंदाजानुसार वेळेत मान्सूनचे आगमन होणार आहे. त्यामुळे मान्सूनपूर्व आपत्ती व्यवस्थापनाच्या प्रशिक्षण कार्यशाळा व मॉकड्रिलचे उपविभागीय स्तरावर आयोजन करण्यात आले आहे. ८ जून रोजी सकाळी १० ते दुपारी १ या कालावधीत अंबाझरी तलाव परिसरात नैसर्गिक पूर परिस्थितीत घ्यावयाच्या काळजीबाबतचे मॉकड्रिल होणार आहे.
मान्सून कालावधीत अनेक नैसर्गिक व मानवनिर्मित आपत्ती उद्भवतात. विशेषत: पूर परिस्थिती निर्माण होण्याची शक्यता असते. अशा परिस्थितीत पूर परिस्थितीचा सामना कसा करावा व बचाव पथकाचे कार्य कसे करावे, याचे प्रशिक्षण व मार्गदर्शन या प्रशिक्षणात देण्यात येणार आहे. राज्य आपत्ती प्रतिसाद दलामार्फत या प्रशिक्षणाचे आयोजन करण्यात आले आहे. या प्रशिक्षणामध्ये तालुका किंवा गावातील नदी तलावाजवळ प्रशिक्षण व मॉकड्रिल आयोजित करण्यात येणार आहे. प्रशिक्षणामध्ये तालुक्यातील तसेच संभाव्य पुराचा धोका असलेल्या गावातील स्थानिक प्रशासनामध्ये कार्यरत अधिकारी किंवा कर्मचारी, संस्था जलतरणपटू, शोध व बचाव पथकातील सदस्य यांना सहभागी करून घेण्यात येणार आहे. प्रशिक्षण ठिकाणी तहसील कार्यालयात उपलब्ध असलेल्या आपत्ती व्यवस्थापन निगडीत साहित्य सामुग्रीची तपासणी राज्य आपत्ती प्रतिसाद दलामार्फत करण्यात येणार आहे. यासाठी राज्य आपत्ती प्रतिसाद दलाचे पोलीस उपनिरीक्षक अजय काळसर्पे हे समन्वयक म्हणून काम करणार आहेत. याबाबतचे आदेश नुकतेच जिल्हाधिकारी रवींद्र ठाकरे यांनी निर्गमित केले आहेत.
उपविभागनिहाय प्रशिक्षण
८ जून नागपूर शहर, ९ जून रामटेक, १० जून मौदा, ११ जून सावनेर, १४ जून नागपूर ग्रामीण आणि १५ जून रोजी काटोल इथे प्रशिक्षणाचे आयोजन करण्यात आले आहे.