नागपूर : ‘ओमायक्रॉन’ विषाणूची बाधा असलेल्या नागपुरातील पहिल्या रुग्णाला बुधवारी ‘एम्स’मधून सुट्टी देण्यात आली. या रुग्णाची मंगळवारी करण्यात आलेली आरटीपीसीआर चाचणी निगेटिव्ह आली होती. २४ तासांनंतर पुन्हा चाचणी केली गेली. त्याचा अहवालही निगेटिव्ह आल्याने त्याला रुग्णालयातून सुट्टी देण्यात आली. पुढील १० दिवस या रुग्णाला होम क्वारंटाईन राहावे लागणार आहे.
हा ४० वर्षीय रुग्ण पश्चिम आफ्रिकेतील बुर्किना फासो या शहरातून ५ डिसेंबर रोजी दिल्लीमार्गे नागपूर विमानतळावर पोहोचला. येथे आरटीपीसीआर चाचणी केली असता अहवाल पॉझिटिव्ह आला होता. यामुळे ६ डिसेंबरपासून हा रुग्ण एम्समध्ये भरती होता. १२ डिसेंबर रोजी ओमायक्रॉन विषाणूचा संसर्ग असल्याचा अहवाल प्राप्त झाला होता. या रुग्णाला कुठलीही लक्षणे नव्हती.