- कौतिकरावांच्या दिलगिरीमुळे मनभेद चव्हाट्यावर
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : गेल्या सात-आठ दिवसांपासून सुरू असलेल्या ९४व्या अ. भा. मराठी साहित्य संमेलनाच्या स्थळाच्या वादावर पडदा टाकण्याचे प्रयत्न दोन्ही गटाकडून प्रसारित करण्यात आलेल्या खुलाशांवरून झाले आहे. मात्र, अ.भा. मराठी साहित्य महामंडळाचे अध्यक्ष कौतिकराव पाटील यांनी व्यक्त केलेल्या ‘दिलगिरी’वरून या दोन्ही गटात वाढलेले मनभेद चव्हाट्यावर आले आहेत.
महामंडळाने आधीच स्पष्ट केलेल्या निर्देशावरून ७ जानेवारीला संमेलनस्थळ म्हणून नाशिकची पाहणी केल्यानंतर शुक्रवारी नाशिकलाच मार्च अखेरीस संमेलन होणार असे जाहीर केले. नाशिकलाच संमेलन होणार, हे कौतिकराव ठाले-पाटील यांच्या एकूणच धोरणावरून आधीपासूनच स्पष्ट होते. गुरुवारी केवळ त्यावर अधिकृत शिक्कामोर्तब करण्यात आले. मात्र, संमेलन स्थळावरून निर्माण झालेल्या नाशिक विरुद्ध दिल्ली वादावर पडदा टाकणारा खुलासा जाहीर करताना कौतिकराव पाटील यांनी मोदी व गडकरी यांच्यासंदर्भात जो ‘दिलगिरी’ हा शब्द वापरला आहे, त्यावर सरहद संस्थेचे अविनाश चोरडिया व डॉ. अमोल देवळेकर यांनी आक्षेप घेतला आहे. महामंडळ अध्यक्षांनी सरहद संस्थेबद्दल जो अविश्वास व्यक्त केला आणि संस्थेच्या धोरणावर प्रश्नचिन्ह निर्माण करून आपलेच बोललेले शब्द फिरवले, याबद्दलही दिलगिरी व्यक्त करणे अपेक्षित होते, अशी भावना देवळेकर व चोरडिया यांनी आपल्या खुलाशावरून व्यक्त केले. ‘आमच्या सरळ, स्पष्ट व सद्हेतूबद्दल शंका घेण्याचा सन्माननीय ठाले पाटील यांचा हा प्रकार मात्र खचितच ‘कौतुकास्पद’नाही, असे आम्हाला खेदाने नमूद करावे लागत आहे’ अशा एका वाक्यात कौतिकराव ठाले-पाटील यांच्याबाबत नाराजी व्यक्त केली गेली आहे.
दिल्लीकरांसाठी विशेष संमेलन दिले होते. मात्र, पुण्यातील सरहदचे निमंत्रक संजय नहार यांनी महामंडळाचा प्रस्ताव नाकारला आणि दिल्लीकरांची विशेष अ.भा. मराठी साहित्य संमेलनाची संधी हुकवली.
- कौतिकराव पाटील, अध्यक्ष - अ.भा. मराठी साहित्य महामंडळ
नाशिक हे स्थळ आधीपासूनच निश्चित हाेते, हे आता स्पष्ट झाले आहे. स्थळाची घोषणा होताच आमच्या लेखी हा वाद संपला आहे. मात्र, इतिहासात या घटनाक्रमाचे मूल्यांकन होईल, तेव्हा कोण खरे नि कोण खोटे हे स्पष्ट होईल. ठाले-पाटील वारंवार दिल्लीला विशेष संमेलन दिले पण सरहदनेच नाकारले, असे सांगतात. मात्र, महामंडळाने आम्हाला त्याबाबत कधीच लेखी पत्र का दिले नाही, हे स्पष्ट नाही.
- संजय नहार, संस्थापक, सरहद
.........