--
वीटभट्टीचे अवैध खड्डे जीवघेणे
सावंगी देवळी येथील नाल्याशेजारी मोठ्या प्रमाणात वीटभट्टीचा व्यवसाय चालतो. वीटभट्टीला लागणाऱ्या पाण्यासाठी नाल्यात छोटे बंधारे टाकून १५ ते २० फुटाचे खड्डे खोदण्यात आले आहेत. बंधाऱ्यामुळे या खड्ड्यांच्या खोलीचा कुणालाही अंदाज येथे नाही. याच खड्ड्यात दोन चिमुकल्यांचा करुण अंत झाल्याने ग्रामस्थांनी स्थानिक प्रशासनाविरुद्ध रोष व्यक्त केला.
२०१५ च्या घटनेची पुनरावृत्ती
२०१५ मध्ये या याच नाल्याच्या खड्ड्याजवळ गौरीपूजनाच्या दिवशी सहा महिला गेल्या असताना खोल खड्ड्यातील पाण्यात बुडून त्यांचा मृत्यू झाला होता. इतक्या मोठ्या घटनेनंतरही प्रशासनाने येथे कोणत्याही प्रकारच्या उपायोजना केल्याने रविवारी ६ वर्षापूर्वी झालेल्या घटनेची येथे पुनरावृत्ती झाली.
चिमुकल्यांचे मृतदेह दिसताच वडिलांनी फोडला हंबरडा
खड्ड्यातून चिमुकल्याचे मृतदेह काढण्याचे कार्य सुरु होते तेेव्हा त्यांची आई घरीच होती. वडील घटनास्थळीच होते. काही काळाने मुलीचा मृतदेह बाहेर काढल्यानंतर त्यांनी हंबरडा फोडला. यावेळी तेथे उपस्थितांचे डोळेही पाणावले.
ग्रामस्थ व लोकप्रतिनिधी आक्रमक
दोन चिमुकल्यांचा मृत्यू केवळ स्थानिक प्रशासनाच्या हलगर्जीपणामुळेच झाल्याचा आरोप सांवगी येथील ग्रामस्थ आणि लोकप्रतिनिधींनी याप्रसंगी केला. या खड्ड्यांबाबत महसूल विभागाकडे वारंवार तक्रारी करण्यात आल्या आहेत. मात्र कोणतीही कारवाई करण्यात आली. येथे २०१५ मध्ये सहा महिलांचा तर आज दोन चिमुकल्यांचा जीव गेला. यासाठी दोषी कोण असा सवाल करीत संबंधितांवर कारवाई करण्याची मागणी जि.प.च्या महिला व बाल कल्याण विभागाच्या सभापती उज्ज्वला बोढारे व जि.प.सदस्य दिनेश बंग यांनी याप्रसंगी केली. घटनास्थळी सहायक पोलीस उपायुक्त पी. कार्यकर्ते, वरिष्ठ पोलीस निरीक्षक सारीण दुर्गे, पोलीस उपनिरीक्षक विनोद नरवाडे, जयदीप पवार, पोलीस कर्मचारी दिलीप ठाकरे, कमलेश ठाकरे, भारती मेश्रे यांचा मोठ्या प्रमाणात पोलीस ताफा तैनात करण्यात आला होता.