दयानंद पाईकराव
नागपूर : कॅशलेस व्यवहारांना चालना देण्यासाठी रेल्वेच्या सर्वच आरक्षण कार्यालयांत केंद्र शासनाने ‘पीओएस’मशीन (पॉईंट ऑफ सेल) उपलब्ध करून दिल्या. परंतु मागील अनेक दिवसांपासून अजनी येथील आरक्षण कार्यालयातील या मशीन बंद पडत असल्यामुळे प्रवाशांची गैरसोय होत आहे.
केंद्र शासनाने कॅशलेस व्यवहारांना चालना देण्यासाठी मोठ्या प्रमाणावर अभियान राबविले. यात चार वर्षांपूर्वी देशभरातील रेल्वेच्या आरक्षण केंद्रात प्रवाशांना कॅशलेस व्यवहार करता यावेत यासाठी ‘पीओएस’मशीन उपलब्ध करून दिल्या. त्यानुसार प्रवाशांनी आरक्षणाचा अर्ज भरला आणि अर्जासोबत आपले डेबिट किंवा क्रेडिट कार्ड दिले की तिकिटाची रक्कम संबंधित प्रवाशाच्या बँक खात्यातून कपात होते. त्यासाठी प्रवाशांना आपल्या खिशात रोख रक्कम बाळगण्याची गरज नाही. नागपूर रेल्वेस्थानकावर ही योजना चांगल्या पद्धतीने सुरू आहे. परंतु मागील अनेक दिवसांपासून अजनी आरक्षण कार्यालयात या कॅशलेस स्कीमचा बट्ट्याबोळ झाला आहे. या कार्यालयातील ‘पीओएस’ मशीन नादुरुस्त झाल्या आहेत. अनेकदा या मशीनला नेटवर्कच मिळत नाही. त्यामुळे तिकीट काढण्यासाठी गेलेल्या आणि डेबिट किंवा क्रेडिट कार्डने पेमेंट देणाऱ्या प्रवाशांना तिकीट न घेताच रिकाम्या हाताने परतावे लागत आहे. अजनीच्या आरक्षण कार्यालयातून दिवसाकाठी जवळपास ६०० प्रवासी आरक्षणाचे तिकीट खरेदी करतात. यातील २०० प्रवासी कॅशलेस व्यवहार करतात; परंतु ‘पीओएस’ मशीनच बंद पडल्यामुळे जवळपास २०० प्रवाशांना तिकीट न घेताच रिकाम्या हाताने परतण्याची वेळ येत आहे. या मशीनची देखभाल करण्यासाठी अजनी आरक्षण कार्यालयातील प्रभारींनी उपाययोजना करण्याची गरज आहे. परंतु काहीच उपाययोजना होत नसल्यामुळे त्याचा प्रवाशांना मनस्ताप होत असून, यात रेल्वे प्रशासनाने लक्ष घालण्याची गरज निर्माण झाली आहे.
................
प्रवाशाने दिली लेखी तक्रार
शुक्रवारी दुपारी अडीच वाजता एक प्रवासी अजनी आरक्षण कार्यालयात तिकीट काढण्यासाठी गेला. परंतु ‘पीओएस’ मशीन बंद असल्यामुळे या प्रवाशाला तिकीट खरेदी करता आले नाही. त्यामुळे रेल्वेच्या या कुचकामी यंत्रणेबद्दल संबंधित प्रवाशाने लेखी तक्रार देऊन आपली नाराजी व्यक्त केली आहे.
.............