लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : विधानसभेतील विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस व भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी गुरुवारी सकाळी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या मुख्यालयाला भेट दिली. या वेळी त्यांनी सरसंघचालक डॉ. मोहन भागवत व सरकार्यवाह भय्याजी जोशी यांची भेट घेतली. विशेष म्हणजे हे दोन्ही नेते विमानतळाहून थेट संघ मुख्यालयातच गेले.
गुरुवारी सकाळी ११.३० च्या सुमारास दोन्ही नेत्यांना भेटीची वेळ देण्यात आली होती. मात्र, नागपुरात दाखल झाल्यानंतर सकाळी ९ च्या सुमारासच दोन्ही नेते संघ मुख्यालयात पोहोचले. सरकार्यवाहांशी त्यांची जास्त वेळ चर्चा होऊ शकली नाही. मात्र, डॉ. मोहन भागवत यांच्यासोबत बंदद्वार चर्चा झाली. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, वर्तमान राजकीय स्थितीसह मराठा आरक्षणावरही दोन्ही नेत्यांची सरसंघचालकांशी चर्चा झाली. मराठा आरक्षणावर सर्वोच्च न्यायालयात सुनावणी झाल्यानंतर आता आरोप-प्रत्यारोप होऊ लागले आहेत. महाविकास आघाडीतील नेत्यांनी केंद्रावर याचे खापर फोडले असून, भाजपने राज्य सरकारला धारेवर धरले आहे. चर्चेनंतर ९.३० च्या सुमारास फडणवीस व पाटील संघ मुख्यालयातून रवाना झाले.