नागपूर : राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठातर्फे सरन्यायाधीश शरद बोबडे यांना ‘एलएलडी’ (डॉक्टर ऑफ लॉ) ही मानद पदवी प्रदान करण्याचा प्रस्ताव व्यवस्थापन परिषदेने मंजूर केला होता. यासाठी ३ एप्रिल रोजी विशेष दीक्षांत समारंभ आयोजित करण्याचे नियोजन असून, त्यासंदर्भात ‘सिनेट’च्या तातडीच्या सभेत शुक्रवारी चर्च होणार आहे. यासंदर्भातील प्रस्तावाला ‘सिनेट’ने मंजुरी दिल्यानंतर पुढील पावले उचलण्यात येतील.
सरन्यायाधीश बोबडे यांचे शिक्षण नागपूर विद्यापीठातच झाले. त्यांच्यामुळे नागपूर व विदर्भाची मान उंचावली गेली आहे. विधी क्षेत्रातील त्यांचे योगदान लक्षात घेता त्यांना मानद पदवी प्रदान करण्याचा निर्णय घेण्यात आला. त्यांच्याकडून ३ एप्रिल ही तारीख देण्यात आली असून, त्याच दिवशी विशेष दीक्षांत समारंभ आयोजित करण्याचा विद्यापीठाचा मानस आहे. यासंदर्भात ‘सिनेट’मध्ये चर्चा होईल. सोबतच मुख्य अतिथी म्हणून राष्ट्रपती किंवा उपराष्ट्रपतींना निमंत्रित करण्यात येणार आहे. यासंदर्भातदेखील चर्चा होईल.
विद्यार्थ्यांसाठी दीक्षांत कधी
‘कोरोना’च्या वर्षात ‘न भूतो न भविष्यति’ परिस्थितीत अंतिम वर्षाची परीक्षा उत्तीर्ण करणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी दीक्षांत समारंभ आयोजित करण्याबाबत काहीच निश्चिती झालेली नाही. विद्यापीठ आता हिवाळी परीक्षांच्या नियोजनात आहे. त्यामुळे ‘ऑनलाईन’ माध्यमातून झालेल्या परीक्षात उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांना दीक्षांत समारंभासाठी प्रतीक्षा करावी लागणार आहे.