राज्यातील सर्व मध्यवर्ती कारागृहात मध्यरात्री होणार प्रयोग : पुनरावृत्ती टळणार का ?नरेश डोंगर नागपूरजेल ब्रेकच्या घटना रोखण्यासाठी राज्यातील सर्व मध्यवर्ती कारागृहात यापुढे मध्यरात्रीनंतर ‘चाय पे चर्चा’ केली जाणार आहे. होय, काहीसा अफलातून वाटत असला तरी हा प्रयोग मध्यरात्रीनंतर होणाऱ्या जेल ब्रेकच्या घटना थांबविण्यासाठी प्रभावी ठरू शकतो, अशी पक्की खात्री राज्य कारागृह प्रशासनाला आहे. भोपाळ जेल ब्रेकने देशभरात खळबळ उडवून दिली आहे. सिमीचे आठ खतरनाक दहशतवादी सोमवारी पहाटे कारागृहातील सुरक्षा रक्षक रमाशंकर सिंग यांची हत्या करून पळून गेले. देशातील सुरक्षित समजल्या जाणाऱ्या कारागृहापैकी एक असलेल्या भोपाळ कारागृहात ही घटना घडल्याने देशभरात खळबळ उडाली आहे. देशाचे हृदयस्थळ असलेल्या नागपूर कारागृहात ३१ मार्च २०१५ ला अशीच एक घटना घडली होती. येथील मध्यवर्ती कारागृहाची सुरक्षा व्यवस्था भेदून पाच खतरनाक कैदी पळून गेले होते. अनेक महिने पोलिसांशी लपंडाव खेळल्यानंतर त्यातील चौघांना गुन्हे शाखेच्या पथकाने जेरबंद करण्यात यश मिळवले. मात्र, नागपुरातील ‘जेल ब्रेक’ने राज्याच्या कारागृह प्रशासनाला जबर हादरा दिला होता. या हादऱ्यातून सावरण्याच्या तयारीत असलेल्या कारागृह प्रशासनाला ‘भोपाळ जेल ब्रेक’च्या घटनेने पुन्हा एकदा धक्का दिला आहे. नागपूर ‘जेल ब्रेक’ची पुन्हा राज्यात कुठेच पुनरावृत्ती होऊ नये म्हणून खबरदारीच्या कोणत्या उपाययोजना करायच्या, त्याबाबत राज्य सरकार, कारागृह प्रशासन आणि सुरक्षा यंत्रणांच्या शीर्षस्थांचे प्रदीर्घ मंथन झाले. त्यानंतर राज्यातील कारागृहांमध्ये सुरक्षेच्या कोणत्या उपाययोजना करायच्या त्यासाठी इस्रायलचे सुरक्षा तज्ज्ञही येऊन गेले. त्यांनी राज्यातील सर्वच मोठ्या कारागृहांची सुरक्षा व्यवस्था तपासली आणि आणखी काय करायचे, त्याबाबतचा सविस्तर अहवालही सरकारला सादर केला. या अहवालानुसार राज्यातील कारागृहांना आत-बाहेर सुरक्षा कवच दिले जाणार आहे. त्याबाबतच्या हालचाली प्रशासकीय पातळीवर सुरू असतानाच ‘भोपाळ जेल ब्रेक’ घडल्याने तातडीने कोणत्या उपाययोजना करायच्या, ते पुन्हा एकदा चर्चेला आले. त्याच पार्श्वभूमीवर, कारागृहात मध्यरात्रीनंतर ‘चाय पे चर्चा’ करायची, असा उपाय समोर आला आहे. ‘जेल ब्रेक’च्या घटना रोखण्यासाठी ‘चाय पे चर्चा’चे समीकरण समजून घेण्याचा प्रयत्न केला असता, एका वरिष्ठ अधिकाऱ्यांनी सांगितले. नागपूर, भोपाळ, खंडवा आणि जेथे कुठे जेल ब्रेकच्या घटना घडल्या त्या सर्व पहाटे २ ते ३ नंतरच घडल्या. रात्रपाळीत कर्तव्यावर असलेल्यांना या वेळेत ‘डुलकी’ येते.
जेल ब्रेक रोखण्यासाठी कारागृहात चाय पे चर्चा
By admin | Published: November 02, 2016 2:23 AM