लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : ‘सिरी’ (सेंट्रल इंडिया रिसर्च इन्स्टिट्यूट) व राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठ यांच्या संयुक्त विद्यमाने भौतिक विश्वासंदर्भात आंतरराष्ट्रीय संमेलनाचे आयोजन करण्यात आले आहे. २६ फेब्रुवारी ते १ मार्च या कालावधीत होणाऱ्या या संमेलनाला देश-विदेशातील नामांकित शास्त्रज्ञ व संशोधक उपस्थित राहणार आहेत. यात डॉ. जयंत नारळीकर यांचादेखील समावेश असेल, अशी माहिती ‘सिरी’चे संचालक डॉ. संजय वाघ यांनी दिली.या संमेलनात जर्मनीच्या ‘मॅक्स प्लांक’संस्थेतील शास्त्रज्ञ डॉ. गेयुंग चॉन, डॉ. हान्स बोरिंजर व चीनच्या ‘बीजिंग आॅर्ब्सवेटरी’चे डॉ. जिनलीन हान हे ‘गॅलेक्सी’च्या, दीर्घिका यांच्या निरीक्षणावर प्रकाश टाकतील. डॉ. जयंत नारळीकर गुरुत्वाकर्षण लहरींबाबत निरीक्षण मांडतील. पुण्याच्या ‘आयुका’ संस्थेचे संशोधक डॉ. अजित केवाभी, अमेरिकेतील ओहायो विद्यापीठाचे डॉ. समीर माथूर, पॅरिस विद्यापीठाचे शास्त्रज्ञ डॉ. मार्टिन बुचर, मेक्सिको येथील डॉ. ओविजिक्स, मुंबईच्या ‘टीआयएफआर’चे डॉ. उन्नीकृष्णन, जपानच्या टोकियो विद्यापीठाचे संशोधक डॉ. युटो मिनामी, दक्षिण आफ्रिकेतील क्वाझुलु-नाताळ विद्यापीठातील शास्त्रज्ञ डॉ. डेविन क्रिच्टन, डॉ. सुनील महाराज, इंग्लंडच्या हर्टफोर्डशायर विद्यापीठातील डॉ. मार्टिनी क्राऊस, दिल्ली विद्यापीठातील डॉ. पैत्रिक दासगुप्ता, कोलकाताचे डॉ. नारायण बॅनर्जी, बंगळुरू येथील भारतीय खगोलभौतिकी संस्थेतील डॉ. राम सागर, ‘इस्रो’च्या ‘स्पेस अप्लिकेशन सेंटर’चे डॉ. रतनसिंह बिश्त इत्यादी तज्ज्ञ या संमेलनात सहभागी होणार आहेत.