नागपूर : एकीकडे भटक्या श्वानांची दहशत असताना, दुसरीकडे कुणालाही त्रास न देणाऱ्या श्वानांवर प्राणघातक हल्ल्यांचे प्रकारदेखील वाढले आहेत. माणुसकीलाही लाजवेल असा प्रकार पांजरी टोल नाक्याजवळील एका रेस्टॉरन्टमध्ये घडला. शेजारच्या ढाब्यातील कर्मचाऱ्यांनी संबंधित रेस्टॉरन्टमधील तीन पाळीव श्वानांच्या पिलांना काठीने बदडून ठार मारले. सीसीटीव्ही फुटेजमुळे हा संपूर्ण प्रकार उघडकीस आला.
सैतानालादेखील मान खाली घालायला लावणारा हा प्रकार असून नागरिकांच्या संवेदनशीलतेवरच प्रश्नचिन्ह उपस्थित होत आहे. या घटनेनंतर प्राणीप्रेमींमध्ये संतापाची भावना असून पोलिसांतदेखील तक्रार दाखल करण्यात आली आहे.
पांजरी टोल नाक्याजवळ ले कर्मा नावाचे रेस्टॉरन्ट असून तेथे काही भटके श्वान पाळले आहेेत. त्यातील दोन महिन्यांची तीन पिले दुपारच्या सुमारास झोपली होती. परंतु सायंकाळी रेस्टॉरन्टचे मालक मयूर नगरारे व मंगेश सांबारतोडे यांना पिले दिसली नाहीत व रक्ताचे डाग दिसले. त्यानंतर त्यांनी सीसीटीव्हीची तपासणी केली असता, भयंकर प्रकार समोर आला. शेजारील समाधान ढाब्यावरील तीन कर्मचारी रेस्टॉरन्टमध्ये शिरले व त्यांनी काठीने वार करून तीनही पिलांना जागेवरच ठार मारले. त्यानंतर एका कर्मचाऱ्याने तीनही पिलांचे शव कुंपणाबाहेर फेकले व त्यांना दूर नेऊन अज्ञातस्थळी दफन केल्याचे दिसून आले.
यानंतर नगरारे यांच्या काही मित्रांनी याबाबत संबंधित ढाब्यात जाऊन विचारणा केली असता, त्यांनाही तेथील कर्मचाऱ्यांनी मारहाण केली. यानंतर या प्रकाराची नगरारे यांनी बेलतरोडी पोलिसांत तक्रार केली. पोलिसांनी गुन्हा नोंदवून घेतला आणि मुन्ना शर्मा, स्वप्निल उईके व उल्हास वानखेडे या कर्मचाऱ्यांना ताब्यात घेतले. मालकाच्या सांगण्यावरून हे कृत्य केल्याची कबुली कर्मचाऱ्यांनी दिली. पोलिसांनी या प्रकरणात भा.दं.वि.च्या कलम ४२९, ३२३, ३४ तसेच प्राण्यांचा छळ प्रतिबंधक अधिनियम १९६० च्या कलम ११(१) अंतर्गत गुन्हा दाखल केला.
पोलिसांनी प्राण्यांच्या छळाचे गुन्हे गंभीरतेने घ्यावेत
कुत्र्यांना अशाप्रकारे अमानवीय पद्धतीने मारण्याचे प्रकार वाढीस लागले आहेत. याकडे प्रशासनाचे सपशेल दुर्लक्ष होत आहे. पोलिसांनी या घटनेत अगोदर प्राण्यांचा छळ प्रतिबंधक अधिनियम १९६० च्या कलम ११(१) अंतर्गत गुन्हा दाखल केला नव्हता. आम्ही ही बाब लक्षात आणून दिल्यानंतर हा गुन्हा दाखल केला, अशी माहिती सेव्ह स्पीचलेस ऑर्गनायझेशनच्या संस्थापिका स्मिता मिरे यांनी दिली.