वसतिगृहात तीन वर्षांहून अधिक राहता येणार नाही : गजेंद्र चौहान यांची स्पष्टोक्ती, सरसंघचालकांची घेतली भेटनागपूर : ‘एफटीआयआय’च्या (फिल्म अॅन्ड टेलिव्हिजन इन्स्टिट्यूट आॅफ इंडिया ) वादाचे केंद्रबिंदू ठरलेले अध्यक्ष गजेंद्र चौहान यांनी गुरुवारी सकाळी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक डॉ.मोहन भागवत यांची संघ मुख्यालयात भेट घेतली. या भेटीनंतर त्यांनी ‘एफटीआयआय’च्या वसतिगृहात विद्यार्थ्यांना तीन वर्षांहून अधिक काळ राहता येणार नसल्याचे स्पष्ट केले. यासंदर्भातील निर्णयावर लवकरच शिक्कामोर्तब होणे अपेक्षित आहे. चौहान यांच्या या वक्तव्यामुळे ‘एफटीआयआय’च्या विद्यार्थ्यांच्या चिंतेत भर पडण्याची चिन्हे आहेत.‘एफटीआयआय’मध्ये तीन वर्षांचा ‘सेमिस्टर’ प्रणालीचा अभ्यासक्रम आहे. या तीन वर्षांत विद्यार्थ्यांना वसतिगृहात राहण्याची परवानगी आहे. त्यानंतर विद्यार्थी अभ्यासक्रम पूर्ण करू शकले नाहीत, तर एक वर्ष वाढवून दिले जाईल. विद्यार्थ्यांकडून आम्ही अभ्यासक्रमाच्या सुरुवातीलाच तीन वर्षांचे शुल्क घेतो. त्यामुळे वाढविलेल्या कालावधीत विद्यार्थ्यांना वसतिगृहामध्ये राहता येणार नाही. याबाबत विद्वत्त परिषदेमध्ये निर्णय झाला आहे. आता प्रशासकीय मंडळाच्या बैठकीत यावर शिक्कामोर्तब करण्यात येईल, असे चौहान यांनी प्रतिपादन केले.दरम्यान, गुरुवारी सकाळी गजेंद्र चौहान संघ मुख्यालयात दाखल झाले. सुमारे अर्धा तास त्यांनी सरसंघचालकांशी चर्चा केली. ‘एफटीआयआय’च्या वादानंतर त्यांनी प्रथमच संघ मुख्यालयाला भेट दिली. याबाबत विचारणा केली असता सरसंघचालक मला पित्यासारखे आहेत, त्यामुळेच मुलाच्या लग्नाचे पहिले आमंत्रण सरसंघचालकांना देण्यासाठी आलो असल्याचे चौहान यांनी सांगितले.(प्रतिनिधी)संघाने माझी नियुक्ती केलेली नाही‘एफटीआयआय’च्या अध्यक्षपदी गजेंद्र चौहान यांची नियुक्ती झाल्यानंतर विद्यार्थ्यांनी विरोध केला होता. हे आंदोलन बरेच पेटले होते व यावरून देशातील राजकारणदेखील तापले होते. संघाशी जवळीक असल्यामुळेच चौहान यांची नियुक्ती झाल्याचे आरोप झाले होते. याबाबत चौहान यांना विचारणा केली असता, संघाने माझी नियुक्ती केलेली नाही, असे म्हणत या मुद्यावर बोलण्याचे त्यांनी टाळले.
‘एफटीआयआय’च्या विद्यार्थ्यांना ‘दे धक्का’
By admin | Published: June 24, 2016 2:58 AM