नागपूर : जिल्हा परिषदेच्या सर्व शाळांमध्ये एकाच वेळी ‘दिशा’ हा शैक्षणिक उपक्रम न राबविता प्रत्येक तालुक्यांतील १५ शाळांत हा उपक्रम राबविण्याचा निर्णय शिक्षण समितीच्या बैठकीत घेण्यात आला.
सभापती राजकुमार कुसुंबे यांच्या अध्यक्षतेखाली गुरुवारी पार पडलेल्या बैठकीमध्ये दिशा उपक्रमावर वादळी चर्चा झाली. या उपक्रमामुळे विद्यार्थ्यांची गुणवत्ता न वाढता ती ढासाळण्याची शक्यता असल्याने या उपक्रमासाठी प्रत्येक तालुक्यातील १५ शाळांची निवड करण्याच्या सूचना सभापतींनी केली. या उपक्रमातून एक शिक्षकी शाळा वगळण्यात याव्यात असा मुद्दा समिती सदस्य दुधराम सव्वालाखे आणि प्रकाश खापरे यांनी उपस्थित केला. तशा सूचनाही यावेळी डायट प्राचार्यांना देण्यात आल्यात.
सोबतच त्यांना सूचनाही करण्यात आली की, ज्या शाळांची या उपक्रमासाठी निवड करण्यात येईल, त्या ठिकाणी विद्यार्थ्यांची गुणवत्ता वाढली किंवा नाही, याची प्रत्यक्ष पाहणी शिक्षण समिती सदस्यांकडून करण्यात येईल. यामध्ये जर गुणवत्ता वाढल्याचे आढळून न आल्यास संबंधितांवर आणि प्रसंगी प्राचार्यांवरही कारवाई करण्यात येईल, असे प्रकाश खापरे यांनी सांगितले. विशेष म्हणजे, स्थायीच्या बैठकीत पदाधिकाऱ्यांसह सदस्यांनी डायट प्राचार्य लोकप्रतिनिधींना विश्वासात न घेता दिशा उपक्रम राबविण्यात येत असल्यावर संताप व्यक्त करण्यात अला होता. डायट प्राचार्यांनी आपल्या आवडीच्या उपक्रमासाठी विद्यार्थ्यांचे शैक्षणिक भविष्य दावणीला बांधू नये, अशी भूमिका मांडली होती.
उपाध्यक्षा कुंदा राऊत यांनी तर डायट प्राचार्यांना खुद्द रामटेक तालुक्यातील हिवरा बाजार शाळेमध्ये महिन्याभरासाठी शिकविण्यास पाठवा. तेथील विद्यार्थ्यांची गुणवत्ता वाढली किंवा नाही, याची तपासणी सदस्य करतील. नंतरच हा उपक्रम पुढे राबवायचा किंवा नाही, यावर निर्णय घेऊ असे निर्देश यावेळी अध्यक्षांनी दिले होते. मात्र शिक्षण समितीच्या बैठकीत प्रत्येक तालुक्यातील १५ शाळांत हा उपक्रम राबविण्याचा निर्णय घेण्यात आला. सदस्य शांता कुमरे, दिनेश ढोले आदींसह शिक्षणाधिकारी, डायट प्राचार्या आदी उपस्थित होते.