नागपूर : शिक्षक आमदार ॲड. किरण सरनाईक यांनी मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठात अर्ज दाखल करून शेखर भोयर यांची निवडणूक याचिका खारीज करण्याची मागणी केली आहे. ही निवडणूक याचिका अवैध असल्याचा दावा त्यांनी अर्जात केला आहे.
सरनाईक हे विधान परिषदेच्या अमरावती शिक्षक मतदारसंघातून विजयी झाले आहेत. ते व भोयर हे दोघेही अपक्ष उमेदवार होते. सरनाईक यांनी निवडणूक जिंकण्यासाठी मतदारांना साड्या, पैसे व इतर भेटवस्तू वितरित केल्या. त्यामुळे त्यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल झाला. याशिवाय त्यांनी नामनिर्देशनपत्रासाेबत दाखल केलेल्या प्रतिज्ञापत्रात चुकीची माहिती दिली. लोकप्रतिनिधित्व कायद्यानुसार ही कृती भ्रष्ट व्यवहारामध्ये मोडते, असे भोयर यांचे म्हणणे आहे. त्यामुळे त्यांनी उच्च न्यायालयात याचिका दाखल करून सरनाईक यांची निवड अवैध ठरविण्याची मागणी केली आहे. त्यात सरनाईक यांनी अर्ज दाखल करून ही याचिकाच अवैध असल्याचे म्हटले आहे.
------------
उत्तरासाठी वेळ दिला
या प्रकरणावर न्यायमूर्ती रोहित देव यांच्यासमक्ष सुनावणी झाली. दरम्यान, भोयर यांनी सरनाईक यांच्या अर्जावर उत्तर सादर करण्यासाठी वेळ मागितला. परिणामी, न्यायालयाने प्रकरणावरील सुनावणी ३० एप्रिलपर्यंत तहकूब केली.