प्रादेशिक मनोरुग्णालय : ५० टक्के औषधांचा तुटवडा, कसे होतील रुग्ण बरे?सुमेध वाघमारे नागपूरदररोजच्या ताणतणावांमुळे मनोरुग्णांची संख्या वाढत आहे. मनोरुग्णांवर तातडीने योग्य औषधोपचार केल्यास त्यांना सर्वसामान्यांसारखे आयुष्य जगता येते. मात्र, सरकारी अनास्थेमुळे प्रादेशिक मनोरुग्णालयाची अवस्था बिकट झाली आहे. बाह्यरुग्ण विभागात साधारण ५० टक्के औषधांचा तुटवडा पडला आहे. यातच रुग्णालयात नसलेली औषधे लिहून देणे हे नियमबाह्य ठरत असल्याने रुग्ण औषधांपासून वंचित राहत आहे. परिणामी, आजार कमी होण्यापेक्षा तो बळावत असल्याची धक्कादायक माहिती आहे.प्रादेशिक मनोरुग्णालयात उपचारासाठी यणोऱ्या मनोरुग्णांची संख्या मोठी आहे. रुग्णालयाच्या बाह्यरुग्ण विभागात रोज २५० वर रुग्ण येतात. यातील बहुसंख्य रुग्णांवर महिनोंमहिने उपचार करावे लागतात. गरीब मनोरुग्णांना खासगी रुग्णालयांमध्ये उपचार घेणे परवडत नसल्याने त्यांच्यासाठी हे रुग्णालय आशेचा किरण आहे. परंतु लालफितीचा मनमानी कारभार, अपुरा निधी, डॉक्टरांची कमतरता, पर्यायी उपचारांची वानवा अशा त्रुटींमुळे रुग्णसेवा प्रभावित झाली आहे. यातच गेल्या महिन्यांपासून आवश्यक व तातडीने लागणारी औषधेही नसल्याने मनोरुग्णांचे हाल होत आहे. सूत्रानुसार, ‘अॅण्टी सायोकोटीक’ सारखेच मिरगीवरील ‘अॅण्टी इपिलेप्टिक’ औषधांचे सात ते आठ प्रकार आहेत. परंतु यातील केवळ दोन प्रकार उपलब्ध आहेत. तणावावर उपयुक्त असलेले ‘एन्टी डिप्रेशन’ औषधांचे केवळ दोन प्रकार शिल्लक आहेत.रुग्णालयात अनेक रुग्ण आक्रमक स्वरूपात येतात. परंतु त्यांना शांत करणारे ‘ओलॅन्झापीन’ व ‘हॅलो पेरिडॉल’ हे औषधच नाही. याला पर्याय असलेले औषध रुग्णाला दिले जाते. परंतु त्याचा फारसा प्रभाव पडत नसल्याचे खुद्द रुग्णांच्या नातेवाईकांचे म्हणणे आहे.मिरगीच्या औषधांचाही अभावमिरगीच्या रुग्णांना दिले जाणारे ‘इपिटॉईन’ औषधांचाही अभाव आहे. ‘पॅसीटेन’, ‘लोराझीपॉम’ याही महत्त्वाच्या औषधी रुग्णालयात नाहीत. यामुळे डॉक्टरांना उपचार करण्यासाठी अनेक अडचणी जात आहेत. येथील डॉक्टरांना रुग्णालयात नसलेली औषधे बाहेरून विकत घेण्यासाठी लिहूनही देता येत नाही. असे केल्यास रुग्ण ‘१०४’ क्रमांकावर तक्रारी करू शकतात. यामुळे डॉक्टर आवश्यक औषधे लिहून न देता पर्यायी औषधे देऊन वेळ भागवून नेत असल्याचे चित्र आहे. (प्रतिनिधी)स्थानिक पातळीवर औषधांची खरेदी रुग्णालयात औषधेच नाही असे नाही. जी औषधे नाहीत त्याच्या पर्यायी औषधे दिली जात आहेत. रुग्णालयात जी औषधे नाहीत त्याची माहिती मिळताच सोमवारी पाच हजार रुपयांची औषधे खरेदी करण्यात आली आहेत. या शिवाय औषधांसाठी मोठा निधी लवकरच रुग्णालयाला उपलब्ध होणार आहे. -डॉ. आर.एस. फारुखी, वैद्यकीय अधीक्षक, प्रादेशिक मनोरुग्णालय
औषधांपासून मनोरुग्ण वंचित
By admin | Published: February 07, 2017 1:48 AM