लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : वेस्टर्न कोलफिल्डस लि. ने एका दिवसात ५० रॅक कोळसा डिस्पॅच करून एक नवीन रेकॉर्ड बनवला. कोविड -१९ संसर्ग दरम्यान वेकोलिने यासोबतच रेल्वे व रस्ते मार्गाने एका दिवसात आतापर्यंत सर्वाधिक २.४६ लाख टन कोळसा पोहोचवण्याचाही रेकॉर्ड प्रस्थापित केला.
वेकोलिने मिशन १०० दिवस अंतर्गत एक दिवसात ५० रॅक कोळसा डिस्पॅचचे लक्ष्य ठेवले हाेते. हे लक्ष्य नोव्हेंबरमध्येच पूर्ण करण्यात आले. विशेष म्हणजे कोविड-१९ संसर्ग व त्यामुळे लागू करण्यात आलेल्या लॉकडाऊनमुळे एप्रिल ते जूनपर्यंत १५ ते १८ रॅक कोळसा डिस्पॅच होत होता. प्रतिदिन पुरवठा कमी होऊन ८०हजार टन राहिला होता. विजेची मागणी कमी झाल्यामुळे ही परिस्थिती निर्माण झाली होती. डिस्पॅच वाढवण्यासाठी वेकोलिने औष्णिक वीज केंद्रांना स्वस्त दरात कोळसा पुरवठ्याची ऑफर दिली. यामुळे वेकोलिला २० ते २५ मिलियन टन कोळशाची अतिरिक्त मागणी मिळाली. यासोबतच रेल्वे वाहतूक सुरळीत करण्यासाठी रेल्वे अधिकाऱ्यांशी चर्चा करून समन्वय मजबूत करण्यात आला. ५० रॅक कोळसा पुरवठा ४२ रॅक मध्य रेल्वे, ६ रॅक एसईसीआर व २ रॅक एससीआरच्या माध्यमातून करण्यात आला. कंपनीने डिसेंबर शेवटपर्यंत एका दिवसात ६५ रॅक आणि ३ लाख टन कोळसा डिस्पॅचचे लक्ष्य ठेवले आहे.