लोकमत न्यूज नेटवर्क नागपूर : चित्रकारांची संख्या दिवसागणिक वाढत असताना त्या तुलनेत त्यांना व्यावसायिक यश का लाभत नाही, असा प्रश्न मला अनेक ठिकाणी विचारला जातो. याची अनेक कारण आहेत. परंतु प्रमुख कारण म्हणजे,बहुतेक चित्रकार कुंचला हातात घेता बरोबर हे चित्र कितीत विकले जाईल याचा विचार करतात. याच विचारातून पुढे चित्र प्रदर्शनाचे आयोजन केले जाते. परंतु असे चित्रांचे प्रदर्शन हे काही दुकान नव्हे हे आधी कलावंतांनी समजून घेतले पाहिजे, अशा शब्दात प्रसिद्ध चित्रकार वासुदेव कामथ यांनी नवोदितांना आवाहन केले. जवाहरलाल दर्डा आर्ट गॅलरीत गुरुवारी आयोजित चित्र प्रदर्शनाच्या उद्घाटनासाठी आले असता ते लोकमतशी बोलत होते. या चर्चेत त्यांनी कला क्षेत्रातील व्यावसायिक अभावाच्या अनेक कारणांचा ऊहापोह केला. कामथ म्हणाले, चित्र प्रदर्शनाचे आयोजन सातत्याने व्हायला हवे. कुठल्याही कलावंताने आपली चित्रे शंभर ठिकाणी घेऊन फिरण्यापेक्षा अशा प्रदर्शनात ती लावावी जेणेकरून शंभर ठिकाणची माणसे ती चित्रे बघायला तुमच्याजवळ येतील. आपल्या कलेला सर्वदूर पोहोचविण्यासाठी हा जास्त सन्मानजनक पर्याय आहे. पण, अशा प्रदर्शनात आपले चित्र विकले गेलेच पाहिजे असा हट्ट धरू नका. चित्र विकल्याजाण्याआधी ते पाहणाऱ्याला कसे आवडेल, हे पाहणे महत्त्वाचे आहे. आपले चित्र दुसऱ्याच्या भिंतीवर त्याच्या आवडीने कसे लावले जाऊ शकेल याचा विचार करतानाच त्याचा गुणात्मक दर्जा कसा वाढवता येईल याकडे आपले लक्ष असायला हवे. चित्र नजरेला चांगले वाटणे आणि त्या चित्राने थेट हृदयाला साद घालणे या दोन वेगळया गोष्टी आहेत. पण, दुर्दैवाने ही तफावत कुणी गंभीरतेने लक्षात घेताना दिसत नाही. इथेच आपण चुकतो आणि चित्रांना किंमत मिळत नाही, असे सांगत सुटतो. तुमचे चित्र हृदयाला साद घालणारे असेल तर या तक्रारीला जागाच उरणार नाही, याकडेही कामथ यांनी लक्ष वेधले.कलावंत संवेदनशीलच हवाबहुतेकांची चित्रे अजूनही रंजनवादाच्या पलीकडे जाऊन सभोवतालचे विदारक वास्तव मांडायला धजावत नाहीत, अशीही टीका होत असते. पण, प्रत्येक कलावंताचा पिंड वेगळा असतो. चित्राचा विषय हा अनेकदा तत्कालीन स्थितीवर अवलंबून असतो. कलावंत संवेदनशील मनाचा असेल तर त्याच्या कॅनव्हॉसवर वास्तवच रेखाटले जाईल. ते कुणीही थांबवू शकत नाही.
चित्रांचे प्रदर्शन हे दुकान नव्हे : वासुदेव कामथ
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 22, 2018 10:30 PM
चित्रांचे प्रदर्शन हे काही दुकान नव्हे हे आधी कलावंतांनी समजून घेतले पाहिजे, अशा शब्दात प्रसिद्ध चित्रकार वासुदेव कामथ यांनी नवोदितांना आवाहन केले.
ठळक मुद्देकला क्षेत्रातील व्यावसायिक अभावाच्या कारणांचा केला ऊहापोह