नागपूर : पंतप्रधान नरेंद्र मोंदी यांना पुन्हा सत्तेची चावी मिळवून देण्यासाठी महायुतीतील घटक पक्ष जोमाने काम करीत आहेत. मात्र, लोकसभा जागा वाटपात ‘महायुती’कडून घटक पक्षांकडे दुर्लक्ष होत आहे. मित्रपक्षांना समावून घेण्याचे काम महायुतीकडून होताना दिसत नाही, अशी खंत पीपल्स रिपब्लिकन पार्टीचे राष्ट्रीय कार्याध्यक्ष जयदीप कवाडे यांनी व्यक्त केली आहे.
यातून कवाडे हे नाराज असल्याचे स्पष्ट झाले आहे.कवाडे यांनी म्हटले आहे की, जागा वाटपात महायुतीकडून मित्रपक्षांना वाटा देण्याचे काम होताना दिसत नाही. जागावाटपात मित्र पक्षांना विश्वासात घेण्याची गरज आहे. पंतप्रधान नरेंद्र मोंदींच्या नेतृत्वात महायुती येणाऱ्या लोकसभा निवडणूकीत ४०० हून अधिक जागा जिंकणार आहे. महाराष्ट्रातील लोकसभेच्या ४८ जागा हे महायुती सरकार स्थापन करण्यासाठी महत्त्वाची भूमिका बजाविणार आहे.
राज्यात बहुजन व वंचितांच्या प्रामाणिक मतदारांना पीपल्स रिपब्लिकन पार्टीवर विश्वास आहे. गेल्या अनेक निवडणूकांमध्ये रामटेक आणि लातुरच्या मतदारांनी पीरिपावर वेळोवेळी विश्वास ठेवला आहे. त्यामुळे रामटेक-लातूरची जागा पीरिपासाठी महायुतीने द्यावी, अशी आग्रही मागणी कवाडे यांनी केली आहे