पटोलेंच्या घरी काँग्रेस नेत्यांची नाराजी, शिवसेनेसाठी जागा सोडण्यास विरोध

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 12, 2023 09:55 PM2023-01-12T21:55:43+5:302023-01-12T21:57:07+5:30

Nagpur News नागपूर विभाग शिक्षक मतदारसंघाच्या जागेवर शिवसेनेने बुधवारी महाविकास आघाडीच्या मुंबईतील बैठकीत दावा केला असला तरी स्थानिक काँग्रेस नेत्यांनी याला कडाडून विरोध केला आहे. गुरुवारी प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांच्या नागपुरातील निवासस्थानी काँग्रेस नेत्यांची बैठक झाली.

Displeasure of Congress leaders at Patole's house, opposition to leaving seat for Shiv Sena | पटोलेंच्या घरी काँग्रेस नेत्यांची नाराजी, शिवसेनेसाठी जागा सोडण्यास विरोध

पटोलेंच्या घरी काँग्रेस नेत्यांची नाराजी, शिवसेनेसाठी जागा सोडण्यास विरोध

googlenewsNext
ठळक मुद्दे​​​​​​​१५ जानेवारीला मुंबईत पुन्हा बैठक शिवसेना नेत्यांसमोर आकडेवारी मांडणार

नागपूर : नागपूर विभाग शिक्षक मतदारसंघाच्या जागेवर शिवसेनेने बुधवारी महाविकास आघाडीच्या मुंबईतील बैठकीत दावा केला असला तरी स्थानिक काँग्रेस नेत्यांनी याला कडाडून विरोध केला आहे. गुरुवारी प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांच्या नागपुरातील निवासस्थानी काँग्रेस नेत्यांची बैठक झाली. ही जागा जिंकायची असेल तर कुठल्याही परिस्थितीत शिवसेनेला सोडू नका, असे स्पष्ट मत नेत्यांनी मांडले. यावर पटोले यांनी आपण शिवसेनेला कुठलाही शब्द दिला नसल्याचे सांगत १५ जानेवारी रोजी मुंबईत पुन्हा महाविकास आघाडीची बैठक होईल व त्यात अंतिम निर्णय होईल, असे स्पष्ट केले.

गुरुवारी सकाळी नऊच्या सुमारास माजी मंत्री सुनील केदार, आ. अभिजित वंजारी, डॉ. बबनराव तायवाडे, प्रवक्ते अतुल लोंढे हे प्रदेशाध्यक्ष पटोले यांच्या रहाटे कॉलनी चौकातील घरी पोहाेचले. केदार, वंजारी, तायवाडे यांनी एकसुरात ही जागा शिवसेनेसाठी सोडण्यास विरोध केला. शिवसेनेच्या उमेदवाराची ही निवडणूक जिंकण्याची क्षमता आहे का, या निवडणुकीत पक्षाची व्होट बँक नाही तर संघटनेची व्होट बँक कामी येते. संघटना पक्षांशी बांधील नाही. संघटनेचे लोक शिवसेनेला मतदान करणार नाहीत, असे स्पष्ट मत पटोले यांच्या समक्ष मांडले. तायवाडे यांनी विदर्भ माध्यमिक शिक्षक संघाशी काँग्रेसची नैसर्गिक युती असल्याचा मुद्दा समोर करीत सुधाकर अडबाले यांना समर्थन दिले तर निवडणूक जिंकण्याची संधी आहे, असा दावा केला.

यावर पटोले यांनी आपण मुंबईच्या बैठकीत शिवसेनेला कुठलाही शब्द दिला नसल्याचे स्पष्ट केले. या निवडणुकीत जो उमेदवार निवडून येऊ शकतो, त्याला काँग्रेसकडून समर्थन दिले जाते. त्यामुळे १५ जानेवारी रोजी मुंबईत पुन्हा बैठक होईल. तीत राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील, शिवसेनेचे नेते सुभाष देसाई, शिक्षक भारतीचे नेते आ. कपील पाटील, विदर्भ माध्यमिक शिक्षक संघाचे माजी आ. विश्वनाथ डायगव्हाणे उपस्थित राहतील, असे पटोले यांनी सांगितले. या बैठकीत या निवडणुकीचे समीकरण आकडेवारीसह मांडण्याची जबाबदारी आ. केदार, आ. वंजारी व डॉ. तायवाडे यांच्यावर सोपविण्यात आली.

 

भाजपने शिंदे गटाला एकही जागा दिली नाही

- कॉंग्रेसमध्ये कुणाचीही, कशाचीही नाराजी नाही. नागपुरात काँग्रेस हमखास निवडून येणाऱ्या उमेदवारासोबत राहील. कॉंग्रेसमध्ये गोंधळ सुरू आहे, असे विरोधक बोलत आहेत; पण प्रत्यक्षात भाजपने शिंदे गटाला एकही जागा दिलेली नाही, हे अपेक्षितच होते.

- नाना पटोले, प्रदेश अध्यक्ष, काँग्रेस

ऐनवेळी राष्ट्रवादीचीही उडी

- नागपूरची जागा शिवसेनेला की काँग्रेस म्हणेल त्या संघटनेला, असा घोळ महाविकास आघाडीत सुरू असताना शेवटच्या दिवशी राष्ट्रवादीनेही या निवडणुकीत उडी घेतली. राष्ट्रवादीच्या ओबीसी सेलचे विदर्भ प्रभारी व नागपूर शहर प्रवक्ते सतीश इटकेलवार यांनी शेवटच्या दिवशी अर्ज भरला. मात्र, पक्षाने एबी फॉर्म दिला नसल्याने त्यांनी अर्जावर अपक्ष लिहिले आहे. पक्ष आपल्या बाजूने निर्णय घेईल व समर्थनाचे पत्र देईल, असा विश्वास इटकेलवार यांनी व्यक्त केला.

Web Title: Displeasure of Congress leaders at Patole's house, opposition to leaving seat for Shiv Sena

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.