लाेकमत न्यूज नेटवर्क
सावनेर : शहरातील रेल्वे लाईन परिसरातील गिरी संकुल परिसरात सर्वत्र घाणीचा विळखा असल्याने तेथील रहिवासी नागरिकांच्या आराेग्यास धाेका निर्माण झाला आहे. या परिसरातून वाहणारे सांडपाणी संकुल भागात साचते. तेथे छाेटेखाणी तलावाचे स्वरूप आले असून, सर्वत्र झुडपे व गवत वाढले आहे. शिवाय, घाण पाण्यामुळे दुर्गंधी पसरत असल्याने नागरिकांना वास्तव्य करणे कठीण झाले आहे.
या संकुल परिसरात वाहून येणारे सांडपाणी पुढे जाण्यासाठी प्रशासनाने कुठलीही व्यवस्था केली नाही. सांडपाणी साचल्याने संपूर्ण परिसरात घाण निर्माण झाली आहे. यामुळे डासांची पैदास वाढली असून, डेंग्यू, मलेरिया यांसारखे आजार हाेण्याची शक्यता बळावली आहे. काेराेना महामारीमुळे नागरिकांना आराेग्याची चिंता भेडसावत असताना या ठिकाणी स्वच्छतेकडे दुर्लक्ष केले जात असल्याने रहिवाशांमध्ये तीव्र नाराजी पसरली आहे.
या संदर्भात नागरिकांनी नगराध्यक्ष रेखा माेवाडे, मुख्याधिकारी स्मिता काळे यांना निवेदन देऊन समस्या साेडविण्याची मागणी केली. निवेदन देताना दिवाकर धमंदर, सचिन जगनाडे, मुकुंद काेल्हे, भागवत जगनाडे, वामन बारापात्रे, सुरेश प्रसाद, अनिता रामटेके, गीता वरठी, अशाेक खेरडे, ज्याेती वानखेडे, अनिता कुडे, बिरसिंग बरहैया, डाॅ. हरीश बरहैया, राजश्री देशमुख, वीणा माेहाेड, प्रकाश उपगडे, शांताराम भुरसे, सुरेंद्र चाेपडे, झगुरू प्रसाद, प्रदीप बागडी, वंदना देशमुख, ओंकार ढाेले, आदी उपस्थित हाेते.