लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : ‘या भारतात बंधूभाव नित्य वसू दे, ’ असा संदेश देणाऱ्या राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांनी स्थापन केलेल्या श्री गुरुदेव सेवा मंडळामध्ये बंधूभावाला तडा गेला आहे. या बंधूभावाची दोन गटात विभागणी झाली असून गुरुदेव सेवाश्रमाच्या अधिकारावरून हे दोन गट आमनेसामने उभे ठाकले आहेत. राष्ट्रसंत हा आपला वारसा आहे असे सांगत दोन्ही गटांनी गुरुदेव सेवाश्रमावर दावा ठोकला असून हा वाद आता पोलीस स्टेशनमध्ये पोहचला आहे.या दोन गटांपैकी एक गट श्री गुरुदेव सेवाश्रमाचा तर दुसरा श्री गुरुदेव सेवा मंडळाचा आहे. विशेष म्हणजे राष्ट्रसंतांनी स्थापन केलेल्या श्री गुरुदेव सेवा मंडळांतर्गत गुरुदेव सेवाश्रमाच्या कामाचे १९५४ ला भूमिपूजन केले होते आणि त्यावेळी देशाचे प्रथम राष्ट्रपती डॉ. राजेंद्र प्रसाद उपस्थित होते. मात्र महाराजांनी स्थापन केलेले सेवा मंडळ आणि २०१५ मध्ये निर्माण झालेले सेवा मंडळ एकच आहे का, हे वादाचे कारण ठरले आहे. श्री गुरुदेव सेवाश्रमाच्या पदाधिकाऱ्यांनी याबाबत मंगळवारी गणेशपेठ पोलीस स्टेशनमध्ये रीतसर तक्रार नोंदविली आहे. सेवाश्रमाचे सचिव अॅड. कृपाल भोयर यांनी सांगितले, राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांनी १९५४ मध्ये श्री गुरुदेव सेवा मंडळाची स्थापना केली व त्याअंतर्गत श्री गुरुदेव सेवाश्रम निर्माण केले. त्यांच्यासोबत प्रत्यक्ष काम करणारे सदाशिवराव मोहाडीकर हे गुरुदेव सेवाश्रमाचे आजीवन प्रचारप्रमुख आहेत. मंडळातर्फे १९८३ साली श्री गुरुदेव सेवाश्रमाच्या नावाने धर्मादाय आयुक्त कार्यालयात रीतसर नोंदणी करण्यात आली. त्यावेळी वामनराव गावंडे यांना नगरसेवाधिकारी म्हणून निवडण्यात आले व त्यांच्या निधनानंतर बाबासाहेब पत्राळे हे त्या पदावर आले.२०१६ मध्ये पत्राळे यांचे निधन झाले. त्यापूर्वी संस्थेमधून काढण्यात आलेले सुरेश राजूरकर यांना हाताशी धरून अशोक यावले यांनी नव्या गुरुदेव सेवा मंडळाची निर्मिती केली. त्यावेळी वेगळा पत्ता दाखवला होता. त्या नावाने अनधिकृत कागदपत्रे तयार करून नोंदणी केल्याचा आरोप अॅड. भोयर यांनी केला. या कागदपत्रांच्या आधारे सेवाश्रमाची मालमत्ता नव्या संस्थेच्या नावाने वळती केली तसेच विविध बँक खात्यात असलेला सेवाश्रमाचा निधीही काढून घेतल्याचा दावा अॅड. भोयर यांनी केला.या संपत्तीच्या वादावरून त्यांच्या गटात वाद निर्माण झाला होता व त्यांच्यातील सुरेश राजूरकर यांनी मारहाणीची तक्रारही २०१७ मध्ये गणेशपेठ पोलीस स्टेशनमध्ये केली होती. हा वाद निर्माण झाल्यानंतर यावले गटाचे गौडबंगाल प्रकाशात आल्याचे त्यांनी सांगितले. ही बाब लक्षात आल्यानंतर सदाशिवराव मोहाडीकर यांनी २४ मार्च २०१८ ला आमसभा बोलावून सेवाश्रमाच्या नवीन कार्यकारिणीची घोषणा केली. यामध्ये नगरसेवाधिकारी म्हणून भाऊसाहेब तायवाडे यांची व उपसेवाधिकारी म्हणून ज्ञानेश्वर रक्षक यांची तर इतरांमध्ये अॅड. कृपाल भोयर सचिव, अॅड. विजय मानमोडे कोषाध्यक्ष, शांतिदास लुंगे सहसचिव तर रमा भोंडे यांची महिला प्रमुख म्हणून निवड करण्यात आली. यावले गटाने मंगळवारी सेवाश्रमाच्या संपत्तीवर कब्जा करण्याचा प्रयत्न के ला, त्यामुळे आम्ही पोलीस स्टेशनमध्ये तक्रार केली. त्यांनी जबरदस्तीने सेवाश्रमात आपल्या संस्थेचा बोर्ड लावला. त्यांच्या कारवायांबाबत क्राईम ब्रँच व धर्मादाय आयुक्तांनाही तक्रारी दिल्या असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. गुरुदेव सेवा मंडळ आमचेचयाबाबत अॅड. अशोक यावले यांना विचारले असता, सेवाश्रमावर श्री गुरुदेव सेवा मंडळाचाच दावा असल्याचे त्यांनी सांगितले. १९५४ साली राष्ट्रसंतांनीच श्री गुरुदेव सेवा मंडळाची स्थापना केली असून, हे सेवाश्रम मोझरी आश्रमापासून अलिप्त ठेवले होते. मात्र गेल्या काही वर्षांत अ.भा. श्री गुरुदेव सेवा मंडळाच्या नावाने गुरुकुंज मोझरी आश्रम संस्थेतर्फे नागपूरच्या गुरुदेव सेवाश्रमावर दावा केला जात आहे. त्यासाठी सेवाश्रमाच्या लोकांना हाताशी धरले आहे. मात्र सेवाश्रमाच्या सर्व गोष्टी गुरुदेव सेवा मंडळाच्या नावाने नोंदविल्या आहेत. महानगरपालिकेचा टॅक्स, पाणीपट्टी, संपत्तीची लीज, राज्य शासनाचे प्रपत्र व आयकराचे रिटर्न्सही मंडळाच्या नावाने आहे. त्यामुळे अ.भा. मंडळाने टाकलेले सर्व दावे अपयशी ठरले. त्यामुळे त्यांनी आता मसल पॉवरचा वापर करून सेवाश्रम प्राप्त करण्याचा प्रयत्न चालविला आहे. त्यामुळे २०१५ मध्ये श्री गुरुदेव सेवा मंडळाच्या नावाने रीतसर नोंदणी करण्यात आल्याचे यावले यांनी सांगितले. २०१५ मध्ये नवीन कार्यकारिणी निर्माण करण्यात आल्याचे सांगत अध्यक्ष अॅड. अशोक यावले, सचिव अॅड. सुरेश राजूरकर, उपाध्यक्ष प्रभाकर चौधरी, सहसचिव विठ्ठल पुनसे आदींचा सहभाग असल्याचे त्यांनी सांगितले. आमच्यावरील सर्व आरोप निराधार असून, आमची कार्यकारिणी नियमानुसार काम करीत असल्याचा दावा अॅड. यावले यांनी केला.
गुरुदेव सेवा मंडळाचा वाद चिघळला
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 29, 2018 1:03 AM
‘या भारतात बंधूभाव नित्य वसू दे, ’ असा संदेश देणाऱ्या राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांनी स्थापन केलेल्या श्री गुरुदेव सेवा मंडळामध्ये बंधूभावाला तडा गेला आहे. या बंधूभावाची दोन गटात विभागणी झाली असून गुरुदेव सेवाश्रमाच्या अधिकारावरून हे दोन गट आमनेसामने उभे ठाकले आहेत. राष्ट्रसंत हा आपला वारसा आहे असे सांगत दोन्ही गटांनी गुरुदेव सेवाश्रमावर दावा ठोकला असून हा वाद आता पोलीस स्टेशनमध्ये पोहचला आहे.
ठळक मुद्देदोन गटांनी केला सेवाश्रमावर दावा : पोलिसात तक्रार, धर्मादाय आयुक्तांकडेही प्रकरण