नागपूर : काँग्रेस नेते खा. राहुल गांधी यांची ‘भारत जोडो’ यात्रा महाराष्ट्रात दाखल झाली असताना नागपुरात मात्र काँग्रेस नेत्यांमधील मतभेद टोकाला गेले आहेत. फुटाळा येथील आपल्या मालकीच्या जागेवर आ. विकास ठाकरे हे हेतुपुरस्सर समाजभवनाचे बांधकाम करीत असल्याचा आरोप करणारी पोस्ट काँग्रेसचे प्रदेश सचिव नरेंद्र जिचकार यांनी सोशल मीडियावर व्हायरल केली आहे. तर कितीही दबाव आणला तरी महापालिकेच्या मालकीची जागा आपण जिचकार यांना हडपू देणार नाही, तेथे बिरसा मुंडा समाजभवन बांधलेच जाईल, असे आ. ठाकरे यांनी स्पष्ट केले आहे.
जिचकार यांनी सोशल मीडियावर टाकलेल्या पोस्टमध्ये म्हटले आहे की, फुटाळा येथे आपल्या कुटुंबाच्या मालकीचा प्लॉट आहे. मात्र या अधिकाऱ्यांवर दबाव टाकून, प्लॉटची चुकीची मोजणी करून या प्लॉटवर कब्जा करण्याचा प्रयत्न सुरू आहे. आपण अधिकाऱ्यांना फेरमोजणी करायला सांगितले असता ही वस्तुस्थिती समोर आली. संबंधित प्लॉट खरेदी केली असता माजी महापौर मायाताई इवनाते यांनी येथे स्वातंत्र्यवीर बिरसा मुंडा यांचा पुतळा उभारायचा असल्याचे सांगितले. तेव्हा आपण स्वत:हून प्लाॅटवर रस्त्यावरील जागा स्मारकासाठी दिली. मात्र, विद्यमान आमदार हे माझ्याबाबत आदिवासी व दलित समाजात गैरसमज निर्माण करण्याचा प्रयत्न करीत असल्याचा आरोपही जिचकार यांनी केला आहे.
याबाबत आ. ठाकरे म्हणाले, संबंधित जागा महापालिकेच्या मालकीची आहे. त्यावर बिरसा मुंडा समाज भवन बांधण्याची मागणी तेथील आदिवासी बांधवांनी केली. त्यानुसार आपण नगर विकास खात्याकडून ५० लाख रुपये मंजूर करून घेतले. महापालिकेला निधी मिळताच आपण आदिवासी बांधवांसोबत तेथे भूमिपूजन केले. ही जागा जिचकार यांच्या मालकीची असती तर नगर विकास मंत्रालयाने समाज भवनासाठी मंजुरी दिली असती का? मनपाची जागा हडपून तेथे हॉटेल बांधण्याचा जिचकार यांचा डाव आहे. आदिवासी बांधवांसमोर त्यांची पोलखोल झाल्याने ते चिडून आपल्यावर आरोप करीत आहेत. त्यांच्या आरोपांना कायदेशीर मार्गाने उत्तर देऊ, असेही ठाकरे म्हणाले.