एकाच वस्त्यांना वारंवार निधी : आयुक्तांकडे हस्तक्षेप करण्याची मागणी
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : दुर्बल घटकांसाठी तरतूद असलेल्या ३५.६९ कोटींच्या निधी वाटपावरून महापालिकेतील सत्ताधारी भाजपातच नाराजी आहे. त्यात विरोधकांनीही निधी वाटपासंदर्भात आयुक्तांकडे तक्रार केल्याने हा वाद पेटला आहे.
मागासवर्गीय वस्त्यातील लोकांचे जीवनमान उंचवावे, यासाठी अशा वस्त्यात रस्ते, पाणीपुरवठा, शिक्षण, आरोग्य, स्वच्छता, उद्याननिर्मिती, पथदिवे व शौचालय अशा मूलभूत सुविधा उपलब्ध व्हाव्यात, यासाठी हा निधी खर्च करणे अपेक्षित आहे. मात्र दुर्बल घटकांचा निधी दरवर्षी ठराविक वस्त्यात खर्च केला जातो. सर्व पक्षाच्या नगरसेवकांना समान निधी वाटप व्हावे, अशी मागणी बसपाचे गटनेते जितेंद्र घोडेस्वार यांनी आयुक्तांकडे केली आहे.
काँग्रेसचे नगरसेवक परसराम मानवटकर व आयशा उईके यांनीही आयुक्तांकडे तक्रार करून चौकशीची मागणी केली आहे. आयुक्त यासंदर्भात काय भूमिका घेतात, याकडे नगरसेवकांचे लक्ष लागले आहे.
...
स्थायी समिती सदस्यांचीही तक्रार
स्थायी समितीत निधी वाटपात अन्याय झाला आहे. यासंदर्भात समितीच्या सदस्य नेहा निकोसे यांनी आयुक्तांकडे तक्रार केली आहे. समिती सदस्य असूनही प्रभागातील विकास कामासाठी निधी मिळाला नाही, अशी त्यांची तक्रार आहे.
...
उपोषणाचा इशारा
निधी वाटपातील अन्याय दूर न झाल्यास याविरोधात आयुक्त कार्यालयापुढे उपोषणाला बसण्याचा इशारा बसपाचे गटनेते जितेंद्र घोडेस्वार, स्थायी समिती सदस्य नेहा निकोसे यांनी दिला आहे. यामुळे प्रशासन यासंदर्भात काय भूमिका घेते, याकडे नगरसेवकांचे लक्ष लागले आहे.