आमदार निधीवरून काँग्रेस- राष्ट्रवादीत जुंपली
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 1, 2020 08:32 PM2020-08-01T20:32:58+5:302020-08-01T20:35:51+5:30
कोरोना संक्रमण टाळण्यासाठी आमदारांनी दिलेल्या निधीच्या खर्चावरून काँग्रेस व राष्ट्रवादीतच कलगीतुरा रंगला आहे. निधी खर्चच झाला नाही, असा आरोप राष्ट्रवादीचे सदस्य सलील देशमुख यांनी केला होता. तर देशमुखांच्या आरोपात कुठलेही तथ्य नसल्याचे आरोग्य सभापती कुंभारे यांनी स्पष्ट केले.
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : कोरोना संक्रमण टाळण्यासाठी आमदारांनी दिलेल्या निधीच्या खर्चावरून काँग्रेस व राष्ट्रवादीतच कलगीतुरा रंगला आहे. निधी खर्चच झाला नाही, असा आरोप राष्ट्रवादीचे सदस्य सलील देशमुख यांनी केला होता. तर देशमुखांच्या आरोपात कुठलेही तथ्य नसल्याचे आरोग्य सभापती कुंभारे यांनी स्पष्ट केले.
कोरोनाच्या नियंत्रणाकरिता मास्क, थर्मल स्क्रीनिंग व इतर साहित्य खरेदीसाठी आमदार निधीतून २० लाखांची तरतूद करण्यात आली. जिल्ह्यातील सहा आमदारांनी प्रत्येकी २० लाख रुपये यासाठी दिले होते. एक कोटी २० लाख रुपयांचा निधी खर्च झाला नाही, उपाययोजनात्मक साहित्य ग्रामीण भागात पोहचलेच नाही. या निधीचे काय झाले? कोणते साहित्य खरेदी केले? याबाबतचे प्रश्न सलील देशमुख यांनी सभागृहात उपस्थित केले होते. ही बाब उपाध्यक्ष व आरोग्य सभापतींच्या चांगल्याच जिव्हारी लागली. त्यांनी याबाबत आढावा घेतला असता, देशमुखांनी केलेले आरोप माहिती न घेता केल्याचे निदर्शनास आले.
कुंभारे म्हणाले, तीन महिन्यापूर्वी जिल्ह्यातील सर्व आमदारांना आरोग्यसंदर्भातील खरेदीसाठी निधी उपलब्ध करून देण्याची मागणी केली होती. तेव्हा तीन आमदारांनी १० लाख रुपयांचा जिल्हा नियोजन समितीचा हक्काचा निधी उपलब्ध करून देण्याबाबतचे पत्र जिल्हा नियोजन समितीकडे दिले. त्यामध्ये गृहमंत्री अनिल देशमुख यांनी काटोल, नरखेडसाठी, आमदार टेकचंद सावरकर यांनी मौदा, कामठी व नागपूर ग्रामीणसाठी तर आमदार समीर मेघे यांनी त्यांच्या हिंगणा विधानसभा मतदार संघासाठी निधी दिला. त्यानंतर सदरचा निधी जिल्हा प्रशासनाच्या बीडीएसवर आला. जि.प.ने जिल्हाधिकाऱ्यांकडे सदर निधीतून साहित्य खरेदीचा प्रस्ताव १३ जुलै रोजी जिल्हाधिकाऱ्यांकडे सादर केला. परंतु अद्यापपर्यंत जिल्हाधिकाºयांकडेच हा प्रस्ताव रखडला आहे. त्यामुळे साहित्याची खरेदीच झाली नाही.
सेसफंडातून ५८ लाखाची तरतूद
कुंभारे म्हणाले, जिल्हास्तरावर सॅनिटायझर, मास्क, पीपीई किट, थर्मल स्क्रीनिंग मशीन आदी साहित्य खरेदीकरिता सर्वप्रथम पशुसंवर्धन मंत्री सुनील केदार यांनी जिल्हा खनिज निधीतून २० लक्षाचा निधी उपलब्ध करून दिला. त्यामधून काही साहित्याची खरेदी झाली. तर उर्वरित खरेदी सुरू आहे. तर जि.प.च्या सेसफंडात करण्यात आलेल्या ५८ लाखाच्या तरतुदीमधून ५ लक्ष रुपयातून इन्फ्रारेड थर्मामीटरची खरेदी करून ते जि.प.च्या अखत्यारित प्रत्येक प्राथमिक आरोग्य केंद्रा(पीएचसी)ला उपलब्ध करून देण्यात आली आहे. तर उर्वरित निधीतून औषध व इतर साहित्य खरेदीबाबत निविदा प्रक्रिया राबविण्यात येत आहे.
दोन आमदारांचे योगदान नाही
गृहमंत्री अनिल देशमुख, आमदार समीर मेघे, टेकचंद सावरकर यांनी निधी दिला. उमरेड व रामटेक या विधानसभा क्षेत्रातील आमदारांकडून निधी उपलब्ध झाला नसल्याचे ते म्हणाले.