लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : कुख्यात गुन्हेगारांच्या दोन गटात रविवारी रात्री एका बेकरीत बर्थ डे केक खरेदी करताना वाद झाला. त्यानंतर तिरुपती भोगे नामक कुख्यात गुंडाच्या टोळीने प्रतिस्पर्धी कुख्यात लतिफ नामक गुंडाच्या घरावर जोरदार दगडफेक केली. यामुळे शांतीनगरातील मुदलियार ले-आऊट परिसरात सोमवारी पहाटेपर्यंत प्रचंड दहशतीचे वाताावरण होते.
शांतीनगरात नेहमीच अशांतता निर्माण करणारा तिरुपती भोगे आणि अब्दुल लतिफ अब्दुल रज्जाक या दोघांमध्ये गेल्या अनेक दिवसांपासून अवैध धंदे आणि त्यातून केल्या जाणाऱ्या वसुलीच्या मुद्द्यावरून वाद आहे. भोगेसोबतच लतिफही रेकॉर्डवरचा गुन्हेगार आहे. तो अंमली पदार्थाच्या तस्करीशी जुळला आहे. त्यामुळे लतिफ आणि भोगे टोळीत कुरबुरी सुरूच असतात. या पार्श्वभूमीवर, तिरुपतीच्या मेव्हण्याचा वाढदिवस असल्याने रविवारी रात्री त्याचे साथीदार केक आणण्यासाठी बेकरीत गेले होते. तेथे लतिफ आणि एजाज होता. या दोघांसोबत वाद झाल्यानंतर भोगे तेथे पोहचला. त्याने लतिफला कानशिलात लगावली. त्यानंतर हाणामारीची तक्रार दोन्हीकडून शांतीनगर पोलीस ठाण्यात करण्यात आली. पोलिसांनी या प्रकरणात काऊंटर गुन्हा दाखल केला. दरम्यान, मध्यरात्री १ च्या सुमारास भोगे आणि त्याच्या टोळीतील शाहिद शेख वजिर शेख, अरबाज शेख हमीद शेख, रियाज ऊर्फ रज्जू सरदार अली, मोहम्मद सोहेल मोहम्मद शाबिर, शेख इरफान शेख वजिर हे लतिफ आणि शेख एजाज नामक साथीदाराच्या घरावर गेले. आरोपींनी त्यांना शिवीगाळ करून बाहेर काढण्याचा प्रयत्न केला. नंतर घरावर जोरदार दगडफेक केली. आरोपींनी आपल्या साथीदारांना बोलवून घेतले. शांतीनगर पोलिसांना फोन करून माहिती दिल्याने पोलिसही घटनास्थळी धावले. त्यामुळे आरोपी पळून गेले.
---
लतिफच्या भावाचा चाकू घेऊन हैदोस
या घटनेमुळे परिसरात प्रचंड दहशत निर्माण झाली असतानाच दोन दिवसांपूर्वी कारागृहातून बाहेर आलेला लतिफचा भाऊ रम्मू चाकू घेऊन बाजारात हैदोस घालताना सोमवारी रात्री पोलिसांच्या हाती लागला. दुसरीकडे
तिरुपती भोगे वगळता या प्रकरणात सात आरोपींना अटक करण्यात आली असून शांतीनगर पोलीस तसेच गुन्हेशाखा युनिट तीनचे पोलीस भोगेचा कसून शोध घेत आहेत.
----
पोलीस आयुक्तांकडून गंभीर दखल
या गुन्ह्यातील दोन्ही गटांचे आरोपी कुख्यात आहेत. त्यात या भागातील दुसरा एक कुख्यात गुंड वसिम चिऱ्या काही दिवसांपूर्वीच कारागृहातून बाहेर आला. भोगेचा तो कट्टर वैरी समजला जातो. त्याने आणि भोगेने काही वर्षांपूर्वी शांतीनगरात एकमेकांवर तब्बल ४५ मिनिटे पिस्तुलातून गोळ्या झाडल्या होत्या. नागपुरातील गुन्हेगारी वर्तुळात या सिनेस्टाईल गोळीबाराची आजही चर्चा केली जाते. वसिम चिऱ्याची या प्रकरणात लतिफला हूल आहे की काय, असा संशय आहे. दरम्यान, पोलीस आयुक्त अमितेशकुमार यांनी या प्रकरणाची गंभीर दखल घेतल्याने शांतीनगर ठाण्यातील वातावरण रात्री कमालीचे गरम झाले होते.