एकमेकांविरुद्ध पोलिसात तक्रार नागपूर : बहुजन समाज पार्टीतील पदाधिकाऱ्यांचा वाद आता व्यक्तिगत पातळीवर आला असून तो पोलिसांपर्यंत पोहोचला आहे. दोन्ही बाजूंनी एकमेकांविरुद्ध कारवाई करण्यासाठी पोलिसात तक्रार केली आहे. महापालिका निवडणुकीत तिकीट वाटपाच्या मुद्यावर बसपाचे प्रदेशाध्यक्ष, विलास गरुड, शहराध्यक्ष नागोराव जयकर यांच्याविरुद्ध तिकीट विकल्याचा आरोप करीत बसपाचे माजी प्रदेश कार्यालयीन सचिव उत्तम शेवडे व माजी मीडिया प्रभारी सागर डबरासे यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिला होता. पक्ष नेतृत्वाने याची गंभीर दखल घेत दोघांनाही निलंबित केले होते. यानंतर डबरासे व शेवडे यांनी सोशल मीडियाच्या माध्यमातून बसपाचे प्रदेशाध्यक्ष विलास गरुड आणि शहराध्यक्ष जयकर यांच्याविरुद्ध मोर्चा उघडला होता. त्यामुळे जयकर यांच्या नेतृत्वात बसपा कार्यकर्त्यांनी मंगळवारी पोलीस आयुक्तांची भेट घेऊन डबरासे व शेवडे हे सोशल मीडियावर पक्षाचे प्रदेशाध्यक्ष व आपल्या विरुद्ध आरोप करीत आपली प्रतिमा मलीन करीत असल्याची तक्रार करीत कारवाई करण्याची मागणी केली होती. जरीपटका पोलीस ठाण्यातही तक्रार केली होती. यानंतर आज बुधवारी सागर डबरासे व उत्तम शेवडे यांनी पोलीस आयुक्ताची भेट घेऊन निवेदन सादर केले. यात बसपा प्रदेशाध्यक्ष विलास गरुड, शहराध्यक्ष नागोराव जयकर आणि प्रदेश महासचिव जितेंद्र म्हैसकर यांनी आपल्याला हातपाय तोडण्याची आणि जीवे मारण्याची धमकी दिली असल्याची तक्रार करीत गुन्हे दाखल करण्याची मागणी केली आहे. आता या दोन्ही बाजुंच्या तक्रारीवर काय कारवाई करावी, असा प्रश्न पोलिसांपुढे निर्माण झाला आहे.(प्रतिनिधी)
बसपा पदाधिकाऱ्यांचा वाद पोहोचला ठाण्यापर्यंत
By admin | Published: March 09, 2017 2:25 AM