'दलित' शब्दाचा वाद जुनाच, प्रकाश आंबेडकरांनी सांगितला इतिहास
By ऑनलाइन लोकमत | Published: September 8, 2018 03:30 PM2018-09-08T15:30:22+5:302018-09-08T15:31:22+5:30
दलित शब्दाबाबत न्यायालयानेही तोच म्हणजे 1980 साली सर्वानुमते झालेला निर्णय मान्य केला आहे. दलित हा शब्द वापरायचाच नाही असे सक्तीचे नाही. कारण, काही ठिकाणी दलित शब्द वापरणे आवश्यक असते,
नागपूर - 'दलित' या शब्दाबद्दल यापूर्वी 1980 मध्येही वाद निर्माण झाला होता. ज्याला पाहिजे त्याने तो शब्द वापरावा, ज्याला नको तो वापरणार नाही, असे त्यावेळी ठरले होते. तर, हा निर्णय सर्वांनी मान्यही केला होता. आजपर्यंत तो निर्णय पाळला जात होता, एका शब्दाबद्दल एकदा वाद झाला असताना पुन्हा त्यावर वाद नको, अशी आमची भूमिका असल्याचे भारिपचे अध्यक्ष अॅड. प्रकाश आंबेडकर यांनी म्हटले आहे
दलित शब्दाबाबत न्यायालयानेही तोच म्हणजे 1980 साली सर्वानुमते झालेला निर्णय मान्य केला आहे. दलित हा शब्द वापरायचाच नाही असे सक्तीचे नाही. कारण, काही ठिकाणी दलित शब्द वापरणे आवश्यक असते, असे प्रकाश आंबडेकर यांनी म्हटले आहे. प्रकाश आंबडेकर आज नागपूर दौऱ्यावर होते, त्यावेळी आयोजित पत्रकार परिषदेत बोलताना त्यांनी दलित शब्दाच्या वापराबद्दल आपली भूमिका स्पष्ट केली. तर दलित शब्द अपमानास्पद नाही, ऊर्जा वाढवणारा आहे. हा शब्द रूढ आहे. तो वापरातच आणू नये, ही भावना योग्य नाही, असे केंद्रीयमंत्री आणि रिपाइचे अध्यक्ष रामदास आठवले यांनीही म्हटले होते. तर या निर्णयाला आव्हान देणार, असेही त्यांनी सांगितले होते.
दरम्यान, शासन व प्रसार माध्यमांसह सर्वांना ‘दलित’ शब्दाचा उपयोग करण्यास मनाई करण्यासाठी मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठात पंकज मेश्राम यांनी जनहित याचिका दाखल केली होती. या याचिकेवर सुनावणी करताना न्यायालयानेही दलित शब्द वापरण्यास मनाई केली आहे. दलित हा शब्द असंवैधानिक असून संविधानाचे निर्माता डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनीही हा शब्द वापरण्याला विरोध केला होता, असा दावा या याचिकेत करण्यात आला होता.