जिल्हा परिषदेच्या सभेत तुफान राडा; टेबलची तोडफोड, कागदपत्रे आसनाकडे भिरकावली

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 6, 2022 10:24 AM2022-12-06T10:24:06+5:302022-12-06T10:32:15+5:30

काँग्रेसचे बंडखोर नाना कंभाले यांच्या बळावर भाजप आक्रमक; चर्चा न करता विषय मंजूर केल्याचा रोष

dispute erupts in Nagpur ZP general meet; BJP aggressive on the strength of Congress rebel Nana Kambhale | जिल्हा परिषदेच्या सभेत तुफान राडा; टेबलची तोडफोड, कागदपत्रे आसनाकडे भिरकावली

जिल्हा परिषदेच्या सभेत तुफान राडा; टेबलची तोडफोड, कागदपत्रे आसनाकडे भिरकावली

Next

नागपूर :जिल्हा परिषदेतकाँग्रेसची एकहाती सत्ता असली तरी सदस्यांत आक्रमक चेहरा नाही. त्यात नाना कंभाले यांच्या बंडामुळे सभागृहात काँग्रेस बॅकफूटवर आली आहे. याचा प्रत्यय सोमवारी सर्वसाधारण सभेत आला. चर्चा न करता अध्यक्षांनी विषय मंजूर केल्याचा रोष व्यक्त करीत भाजप सदस्यांनी नाना कंभाले यांच्या नेतृत्वात सभागृहातील टेबलची तोडफोड केली, माईक व कागदपत्रे अध्यक्षांच्या आसनाकडे भिरकावली. यामुळे कामकाज संपताना सभागृहात गोंधळ उडाला होता.

जि. प. अध्यक्षा मुक्ता कोकड्डे यांच्या अध्यक्षतेखाली सोमवारी नवीन पदाधिकाऱ्यांची पहिलीच सर्वसाधारण सभा पार पडली. जवळपास सहा महिन्यांनंतरची ही सभा असल्याने सर्वच सदस्यांना आपल्या सर्कलमधील विषय सभागृहात मांडावयाचे होते. मात्र, अध्यक्षांनी चर्चा न करता विषय पत्रिकेवरील १ ते १० विषयांना मंजुरी दिली. तसेच वेळेवर आलेल्या विषयांनाही मंजुरी दिली, तर विरोधकांनी यावर चर्चेची मागणी करीत गोधळाला सुरुवात केली.

अध्यक्ष व पदाधिकारी सभागृहाबाहेर पडत असताना काँग्रेसचे बंडखोर नाना कंभाले, विरोधी पक्षनेते आतिष उमरे, शिवसेना (शिंदे गट) संजय झाडे, व्यंकट कारेमोरे, आदींनी टेबलची तोडफोड करून माईक भिरकावले, सभागृहाच्या प्रोसिडिंगची कागदपत्रे फेकली. यावेळी अधिकारी आपल्या जागेवर बसून होते. अध्यक्षा मुक्ता कोकड्डे यांनी चर्चा न करता विषयाला मंजुरी घेण्याचा प्रयत्न केला. यावर आम्ही रोष व्यक्त केला. त्यामुळेच सभागृहात फेकाफेक केली. या संदर्भात विभागीय आयुक्तांकडेही तक्रार करणार असल्याचे आतिष उमरे म्हणाले.

फडणवीस यांच्या आदेशानेच जि. प.चा निधी रोखला, माजी अध्यक्ष बर्वेंचा आरोप

जिल्हा परिषदेच्या विकास कामांचा निधी शासनाने थांबविला आहे. जि. प.मध्ये काँग्रेसची सत्ता असल्यानेच निधी न देण्याचे आदेश उपमुख्यमंत्री व जिल्ह्याचे पालकमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिल्याचा आरोप जि. प.च्या माजी अध्यक्षा रश्मी बर्वे यांनी सोमवारी सर्वसाधारण सभेत केला. यावर विरोधकांनी जोरदार आक्षेप घेत आदेश दाखवा नाही तर माफी मागा, अशी मागणी केली. निधी स्थगितीवरून सत्ताधारी व विरोधकांत चांगलीच खडाजंगी झाल्याने गोंधळाची स्थिती निर्माण झाली होती.

डिगडोहला नगरपंचायतीचा दर्जा द्या

हिंगणा तालुक्यातील ग्रामपंचायत डिगडोहला नगरपंचायतीचा दर्जा द्यावा, अशा आशयाचा प्रस्ताव जिल्हा परिषदेकडे पाठविण्यात आला आहे. तो शासनाकडे पाठवून यासाठी प्रशासनाने पाठपुरावा करा, अशी मागणी माजी सभापती उज्ज्वला बोढारे यांनी सभागृहात केली.

बंडखोरांची साथ मिळाल्याने बळ वाढले

जिल्हा परिषदेत काँग्रेसची एकहाती सत्ता असल्याने मागील अडीच-तीन वर्षांत भाजप बॅकफूटवर होती. सभागृहातही आक्रमक दिसत नव्हती. मात्र, अध्यक्ष व पदाधिकाऱ्यांच्या निवडणुकीत संधी न मिळाल्याने नाराज झालेल्या नाना कंभाले यांच्यासह तिघांनी बंडाची भूमिका घेत भाजपला साथ दिल्याने आता विरोधकांची आक्रमकता वाढल्याचे दिसत आहे.

उमप यांनी भिरकावली बॉटल

कोरोना काळात निधी मिळाला नाही. माजी मंत्री सुनील केदार यांनी निधी दिला नाही, असा मुद्दा सुभाष गुजरकर यांनी काढला. केदारांचे नाव येताच समीर उमप आक्रमक झाले. दिनेश ढोले यांनीही त्यांना साथ दिली. उमप यांनी गुजरकर यांच्या दिशेने पाण्याची बॉटल भिरकावत खाली बसण्याचा इशारा केला.

अधिकाऱ्यांमुळे १२ कोटींची कामे अडकली

सिंचन विभागाच्या १२ कोटींचे प्रस्ताव होते. परंतु विभागाने त्याला वेळेत मंजुरी दिली नाही. त्यामुळे याची चौकशी करून अधिकाऱ्यांना सक्तीच्या रजेवर पाठविण्याची मागणी दुधाराम सव्वालाखे यांनी केली. अध्यक्षा मुक्ता कोकड्डे यांनी या प्रकरणाची चौकशी करून आवश्यक कारवाई करण्याचे निर्देश सीईओंना दिले.

फडणवीस यांनी निधी रोखला नाही

स्थगिती उठवण्यासाठी उपमुख्यमंत्री तथा पालकमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासोबत चर्चा केली. त्यांनी यास सहमती दर्शविली आहे. लवकरच सर्व कामे मार्गी लागतील. परंतु पालकमंत्र्यांनी निधी रोखण्याचे आदेश दिले नाही. बर्वे दिशाभूल करीत असल्याचा आरोप विरोधी पक्षनेते आतिष उमरे यांनी केला.

Web Title: dispute erupts in Nagpur ZP general meet; BJP aggressive on the strength of Congress rebel Nana Kambhale

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.