नागपूर : तीन वर्षांच्या कालावधीनंतर निघालेल्या श्रीराम जन्मोत्सव शोभायात्रेत गेलेल्या एका कुटुंबाच्या उत्साहावर एका लहानशा वादामुळे मृत्यूचे पाणी फेरल्या गेले. शोभायात्रा पाहताना पाय लागण्यावरून झालेल्या वादातून झालेल्या धक्काबुक्कीत एका परिचारिकेचा पायऱ्यांवरून पडून मृत्यू झाला. आश्चर्याची बाब म्हणजे संबंधित महिला वाद सोडवायला गेली होती व तीन महिलांच्याच बेजबाबदारीमुळे तिचा जीव गेला. या घटनेमुळे संपूर्ण कुटुंबावर आघात झाला असून तीन अज्ञात महिलांसह चार आरोपींविरोधात सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
संतोषी रामकिशोर बिनकर (५३, बालाजी नगर, मानेवाडा) असे मृतक महिलेचे नाव आहे. गुरुवारी रात्री साडेदहा वाजताच्या सुमारास त्या त्यांचे कुटुंब व नातेवाईकांसह रामनवमीची शोभायात्रा पाहण्यासाठी मुंजे चौकाजवळ आले होते. शोभायात्रा येण्यास उशीर होता व संतोषी यांची पित्ताशयाची शस्त्रक्रिया झाली असल्याने त्यांना उभे राहण्यासाठी त्रास होत होता. त्यामुळे सर्व नातेवाईक बाजुलाच असलेल्या फॉर्च्युन मॉलच्या आतील पायऱ्यांवर जाऊन बसले. त्यांचे नातेवाईक विजय बिनकर यांच्या पत्नीचा पाय चुकीने एका अनोळखी इसमाला लागला. त्यावरून त्या इसमाने वाद घालण्यास सुरूवात केली.
वाद वाढत असल्याचे पाहून विजय बिनकर व संतोषी हे वाद सोडविण्यासाठी गेले. त्यावेळी संबंधित व्यक्ती व त्याच्याबरोबर असलेल्या अनोखळी महिलांनी संतोषी यांना शिवीगाळ करत धक्काबुक्की केली. संतोषी त्यावेळी मॉलच्या पायऱ्यांवरच होत्या व त्या पायऱ्यांना कुठलेही रेलिंग नव्हते. त्या थेट खालच्या मजल्यावरील पायऱ्यांवर पडल्या व त्यांच्या डोक्याला गंभीर दुखापत झाली. त्यांना रक्तबंबाळ अवस्थेत पाहून नातेवाईक लगेच धावले व घटनास्थळावर गलका सुरू झाला. त्यांना तातडीने पंचशील चौकातील एका खाजगी इस्पितळात नेण्यात आले. मात्र तोपर्यंत त्यांचा मृत्यू झाला होता. संतोष बिनकर यांच्या तक्रारीवरून धंतोली पोलीस ठाण्यात चारही अज्ञात आरोपींविरोधात सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.