नागपूर : नळाचे पाणी वाहून जात असल्याच्या मुद्यावरून वाद झाल्यानंतर संतप्त पत्नीने गळफास घेऊन आत्महत्या केली. तर पत्नीचे शव पाहून पतीनेदेखील विषारी औषध घेत आयुष्य संपविण्याचा प्रयत्न केला. कपिलनगर पोलीस ठाण्याच्या अंतर्गत असलेल्या बाबा दीपसिंगनगर येथे झालेल्या या घटनेमुळे परिसरात खळबळ उडाली आहे.
बाबा दीपसिंगनगर येथील प्लॉट क्रमांक १६५ येथे सहारे कुटुंबीय राहतात. गुरुवारी सकाळी १० ते ११ च्या सुमारास प्रफुल्ल सहारे (३०) यांची पत्नी रितू (२७) नळावर पाणी भरत होत्या. पाणी भरत असताना काही प्रमाणात ते वाहून जात होते. त्यावरून प्रफुल्लने त्यांना टोकले व पाणी वाया घालवू नको, असे म्हटले. या मुद्यावरून पती-पत्नीचा वाद सुरू झाला. कारण अगदी क्षुल्लक असले तरी हा वाद पुढे विकोपाला गेला. कुटुंबीयांनी मध्यस्थी करून त्यांना समजविण्याचा प्रयत्न केला. काही वेळाने प्रफुल्ल कामावर निघून गेला.
परंतु रितूच्या मनात संताप धगधगत होता. संतापाच्या भरात तिने आपल्या खोलीतील सिलिंग फॅनला ओढणीने गळफास लावून घेतला. प्रफुल्लच्या आई आशा यांना सून गळफास घेतलेल्या अवस्थेत दिसली. त्यामुळे त्या प्रचंड घाबरल्या व त्यांनी प्रफुल्लला तातडीने घरी येण्यास सांगितले. प्रफुल्ल घरी आला असता पत्नीचे शव पाहून त्याला प्रचंड धक्का बसला. आता आपल्यावरच याचे खापर फुटणार याची जाणीव असल्याने तोदेखील घाबरला. याच तणावातून त्याने विषारी औषध पिले. काही वेळातच त्याची प्रकृती अत्यवस्थ झाली.
एकीकडे गळफास घेतलेली सून व दुसरीकडे विषारी औषध पिलेला मुलगा या स्थितीत आशा सहारे यांनी दोघांनाही कुटुंबीयांच्या मदतीने उपचारासाठी दवाखान्यात नेले. डॉक्टरांनी सुनेला तपासून मृत घोषित केले. तर गंभीर असलेल्या प्रफुल्लवर तातडीने उपचार सुरू केले. पोलिसांना या घटनेची सूचना मिळताच कपिलनगर पोलीस ठाण्यातील अधिकारी व कर्मचारी घटनास्थळी पोहोचले. पोलिसांनी या प्रकरणात अकस्मात मृत्यूची नोंद केली असून, पुढील तपास सुरू आहे.
क्षुल्लक गोष्टीवरून वाद
एरवी पती-पत्नीमध्ये लहान गोष्टींवरून वाद होतच असतात. इतरांप्रमाणे रितू व प्रफुल्लमध्येदेखील वाद व्हायचे. परंतु इतकी क्षुल्लक गोष्ट इतक्या विकोपाला जाईल, याची कुटुंबीयांनादेखील कल्पना नव्हती. सून तर गेली आता कमीतकमी मुलगा तरी वाचावा, अशी प्रार्थना कुटुंबीयांकडून करण्यात येत आहे. प्रफुल्ल मेयो इस्पितळात दाखल असून, रात्री उशिरापर्यंत त्याला शुद्ध आली नव्हती.