योगेश पांडे
नागपूर : एरवी प्रेमविवाह केल्यानंतर पुढे त्याची परिणती वादात होते आणि दाम्पत्यांमध्ये अगदी पोलिस ठाण्याची पायरी चढण्यापासून ते घटस्फोट घेण्यापर्यंत वेळ येते असा सर्वसाधारण समज आहे. मात्र, प्रत्यक्षात नागपुरात प्रेमविवाह केलेल्या दाम्पत्यांच्या तुलनेत कुटुंबीयांनी ठरविलेल्या विवाहातून एकत्र आलेल्या पती-पत्नीमध्येच वादाचे प्रमाण जास्त असल्याची बाब समोर आली आहे. नागपूर पोलिसांच्या ‘भरोसा’ सेलकडे आलेल्या प्रकरणांपैकी ६७ टक्के तक्रारी या ‘अरेंज मॅरेज’ झालेल्या दाम्पत्यांचीच आहेत. प्रेमविवाहाच्या तुलनेत ही संख्या फार जास्त आहे.
महिला अथवा मुलीला तिच्यावर झालेल्या अत्याचारांविरुद्ध लढण्यासाठी शारीरिक आणि मानसिक बळ मिळवून देण्याच्या उद्देशाने नागपूर पोलिसांनी सुरू केलेल्या ‘भरोसा’ सेलकडे पती-पत्नीच्या वादांची प्रकरणे जास्त प्रमाणात येतात. जानेवारी २०१७ ते १५ मे २०२३ या कालावधीत ‘भरोसा’ सेलकडे १२ हजार ८३९ प्रकरणे दाखल झाली. यात प्रेमविवाह झाल्यावर पती-पत्नीमध्ये वाद विकोपाला गेल्यावर आलेल्या प्रकरणांची संख्या ३ हजार ६६१ म्हणजेच २९ टक्के इतकी होती. तर, नातेवाईक व घरच्यांच्या संमतीने लग्न ठरविलेल्या दाम्पत्याचा आकडा ८ हजार ६३५ इतका होता. प्रेमविवाहापेक्षा ‘अरेंज मॅरेज’मध्येच जास्त वाद झाल्याचे या आकडेवारीतून स्पष्ट होत आहे.
संयुक्त कुटुंबातदेखील ‘विभक्त’इतकेच वाद
संयुक्त कुटुंबात पती-पत्नीमध्ये कमी वाद होतात, असादेखील समज आहे. मात्र, प्रत्यक्षात विभक्त कुटुंबांच्या तुलनेत संयुक्त कुटुंबातील वादांच्या तक्रारींमध्येदेखील फारसा फरक नाही. या कालावधीत संयुक्त कुटुंबातील पती-पत्नींच्या वादाच्या ५ हजार ६१२ तक्रारी आल्या. तर, विभक्त कुटुंबात राहणाऱ्या दाम्पत्याच्या वादाच्या ५ हजार ७६६ प्रकरणांची नोंद झाली, अशी माहिती ‘भरोसा’ सेलच्या पोलिस निरीक्षक सीमा सुर्वे यांनी दिली.
दुसऱ्या विवाहाच्या कमी तक्रारी
भरोसा सेलकडे येणाऱ्या तक्रारींमध्ये प्रामुख्याने प्रथम व दुसऱ्या विवाहाच्या तक्रारी जास्त असतात. त्यातही प्रथम विवाहातून निर्माण होणाऱ्या वादांचे प्रमाण जास्त आहे. प्रथम विवाहातील वादातून ११ हजार ५६५ प्रकरणांची नोंद झाली, तर द्वितीय विवाहानंतरच्या भांडणामुळे ७३० प्रकरणे नोंदविली गेली.
‘लिव्ह-इन’ व प्रेम प्रकरणातील वाददेखील ‘भरोसा’ सेलकडे
केवळ पती-पत्नी किंवा ज्येष्ठ नागरिकच नव्हे, तर ‘लिव्ह-इन’मध्ये राहणारे तसेच प्रेमप्रकरण सुरू असलेल्या अविवाहित ‘कपल्स’च्या वादाच्या प्रकरणांचीदेखील ‘भरोसा’ सेलकडे नोंद झाली आहे. २०१७ पासून ‘लिव्ह इन’मधील वादातून ९१, तर प्रेम प्रकरणातील भांडणातून अविवाहित ‘कपल्स’च्या तक्रारीनंतर १५३ प्रकरणे नोंदविण्यात आली.
अशी आहे आकडेवारी
प्रकरण : २०१७ : २०१८ : २०१९ : २०२० : २०२१ : २०२२ : २०२३ (१५ मेपर्यंत)
प्रेमविवाहातून वाद : ५२४ : ५५३ : ३८६ : ४५८ : ६४१ : ७८९ : ३१०
अरेंज मॅरेजमधील वाद : १,७२४ : १४२७ : ९५७ : ९६३ : १३९६ : १५६० : ६०८
लिव्ह-इनमधील वाद : २१ : १२ : १४ : २ : ७ : २४ : ११
अविवाहितांमधील वाद : ३४ : १७ : ८ : १५ : ६ : ५८ : १५