कुही : तंटामुक्त गाव समित्यांच्यामार्फत तंटे सुटत नसल्याने व प्रशासनाचे सहकार्य मिळत नसल्याने समित्यांनी विश्वासार्हता गमावली आहे. गावोगावच्या समित्या अकार्यक्षम असल्याच्या निदर्शनास येत आहे. घरातले भांडण उंबऱ्याबाहेर जाऊ नये, अशी ताकीद पूर्वी घरातील मोठी मंडळी द्यायची. हाच धागा पकडून तत्कालीन गृहमंत्री दिवंगत आर. आर. पाटील यांनी महात्मा गांधी तंटामुक्त गाव अभियानला १५ ऑगस्ट २००७ रोजी राज्यात सुरुवात केली.
गावातील भांडणाचा निपटारा गावातच व्हावा, हा या अभियानाचा मुख्य उद्देश होता. मात्र आता तंटामुक्त समित्याच अकार्यक्षम झाल्याने हे अभियान थांबलेले आहे. दरवर्षी ज्या ग्रामपंचायतीने उत्कृष्ट कार्य केले त्या ग्रामपंचायतीला पारितोषिक मिळायचे. त्यामुळे गाव समित्याही उत्तमरीत्या कार्य करायच्या. महिन्याला ग्रामपंचायत येथे तंटामुक्त समित्यांची सभा व्हायची. यात दोन्ही पक्षकार आमनेसामने उभे राहून तंटा सोडविला जायचा. परंतु आता हे होताना दिसत नाही. काही गावात आजही या समित्यांमार्फत वाद सोडविले जातात. परंतु गुन्ह्याच्या स्वरूपात फारसा बदल व योग्य न्याय मिळत नसल्याने नागरिकांचा या समित्यांवरील विश्वास ढासळत चाललेला आहे.
कुही तालुक्यात ५९ ग्रामपंचायती अंतर्गत १८४ गावांचा कारभार चालतो. तालुक्यात दोन पोलीस स्टेशन आहेत. यात कुही पोलीस स्टेशनअंतर्गत ३७ तर वेलतूर पोलीस स्टेशनअंतर्गत ३६ तंटामुक्त गाव समित्या अस्तित्वात आहेत. या समित्यांपैकी काही मोजक्याच समित्या सक्रिय कार्य करीत आहेत, तर बऱ्याचशा समित्या केवळ नावालाच आहेत. या समित्यांना अपेक्षित असे मार्गदर्शन मिळत नाही. सक्रिय समित्यांची नावेसुद्धा प्रशासनाकडे नाहीत.
पोलीस प्रशासन तंटामुक्त समित्यांकडे लक्ष देत नसल्याने समित्यांचे महत्त्वच कमी झाले. त्यामुळे गावातही त्यांना फारसे महत्त्व दिले जात नाही. त्यामुळे गावातील लहान-मोठे तंटे आता थेट पोलीस ठाण्यात पोहोचायला लागले आहेत.
मांढळ येथील समिती सक्रिय
तालुक्यातील मांढळ येथील तंटामुक्त समिती सक्रिय आहे. येथील ग्रामस्थ व समिती पदाधिकाऱ्यांशी संवाद साधला असता, वादविवाद असल्यास समितीला अर्ज करावा लागतो. त्यानंतर दोन्ही पक्षकाराला आमनेसामने बसवून सामंजस्याने प्रकरण सोडविले जाते. या वर्षात २० तंट्यांचे प्रकरण समितीसमोर आले. त्यातील १४ प्रकरणे सामंजस्याने सोडविण्यात आल्याची माहिती समितीचे अध्यक्ष विनोद ठवकर व निमंत्रक पोलीस पाटील खुशाल डहारे यांनी दिली. तालुक्यात वेलतूर, किन्ही, वग, पारडी, वीरखंडी येथेही तंटामुक्त समित्या सक्रिय आहेत.
तालुक्यात बऱ्याच ठिकाणी समित्यांचे कार्य थंडबस्त्यात आहे. काही ठिकाणी आजही समित्या सक्रिय असून, अनेक प्रकरणे निकाली निघाली आहेत. किरकोळ स्वरूपाच्या गुन्ह्याविषयी गाव तंटामुक्त समितीने सामंजस्याने सोडवून नागरिकांचे समाधान करून द्यावे. यासाठी तंटामुक्त समित्या पुन्हा सक्रिय होणे गरजेचे आहे.
चंद्रकांत मदने, ठाणेदार, कुही.