: वैयक्तिक अनुदान योजनचे चारच लाभार्थी
गणेश हूड
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : प्रधानमंत्री आवास योजनेतील घटक क्र. ४ अंतर्गत वैयक्तिक घरकुल बांधण्यासाठीच्या अनुदान योजनेतून शहरात १०२८ अर्जधारकांचे प्रकल्प अहवाल मंजूर करण्यात आले. यातील चार जणांनाच लाभ मिळाला. त्यातील ८५० प्रस्ताव राज्य शासनाकडे प्रलंबित आहेत तर ११३ पात्र अर्जधारकांना अनुदान निधीचा पहिला टप्या मंजूर झाला आहे, परंतु, हे अनुदान त्यांना प्रत्यक्षात मिळालेले नाही. घरकुल स्वप्नपूर्ती नकाशा मंजुरीच्या अटीत ही योजना अडकली आहे.
सरकारच्या महत्वाकांक्षी सर्वांसाठी घर योजनेत चार घटकांचा समावेश आहे. त्यात पहिला घटक झोपडपट्टीचा पुनर्विकास करणे (एसआरए), हा आहे. दुसरा घटक कर्ज संलग्न व्याज अनुदान योजना तर तिसरा घटक खासगी भागीदारीतून (पीपीपी) परवडणारे घरांची निर्मितीचा आहे. चौथा घटक वैयक्तिक घरकुल बांधण्यासाठी लाभार्थीस प्रत्यक्ष अनुदान देण्याची योजना आहे.
या घटकांतर्गत ज्यांचा स्वमालकीचा भूखंड अथवा जागा आहे, त्यांना घरकुल बांधण्यासाठी राज्य शासनाकडून १ लाख व केंद्र शासनाकडून १.५० लाख रुपये असे एकूण २.५० लाखाचे अनुदान मिळते. या साठी महापालिका क्षेत्रातील १०२८ नागरिकांचे प्रकल्प अहवाल मंजूर करण्यात आले. यातील पात्र लाभार्थीपैकी ११३ लाभार्थीचा सविस्तर प्रकल्प अहवाल महाराष्ट्र शासन व केंद्र शासनाने मंजूर केला आहे. या लाभार्थीसाठी राज्य शासनाच्या १ लाखाच्या अनुदानातील पहिल्या टप्प्यांचे ४० टक्के अनुदान (प्रत्येक लाभार्थीस ४० हजार रुपये) एकूण ४५.२० लाखांचे अनुदान मनपास प्राप्त झालेले आहेत. परंतु, नकाशे मंजूर नसल्याने व अन्य तांत्रिकबाबीमुळे लाभार्थींना अजून अनुदान मिळालेले नाही.
मालकी पट्टा व रजिस्ट्री प्राप्त झालेले झोपडपट्टीवासी या घटकातील अनुदानासाठी पात्र आहेत. शहरातील असे २५० पट्टेधारक व ६०० इतर लाभार्थीही यासाठी पात्र ठरले असून त्यांचे प्रस्तावही अनुदानासाठी शासनाकडे पाठवले आहेत.