आशीष दुबे
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठाच्या २०२०-२१ या वर्षातील प्रवेशप्रक्रियेत मोठ्या प्रमाणावर गडबड झाली आहे. प्रक्रियेदरम्यान पात्रता नसलेल्या अनेक विद्यार्थ्यांना प्रवेश देण्यात आला. सोबतच विद्यार्थ्यांना परीक्षा देण्याची परवानगीदेखील देण्यात आली. हा प्रकार केवळ नागपूरच नव्हे, तर राज्यातील अनेक शहरांत झाला आहे.
या प्रकरणाची कुठलीही चौकशी करण्यात आलेली नाही. कुलगुरू डॉ. ई. वायुनंदन यांनादेखील याची माहिती देण्यात आलेली नाही. ‘लोकमत’ला मिळालेल्या माहितीनुसार परीक्षेचे निकाल घोषित झाल्यानंतर या प्रकाराचा खुलासा झाला. राज्यातील इतर विभागीय केंद्रांसोबतच नागपूरस्थित विभागीय केंद्रातून परीक्षा देणाऱ्या विद्यार्थ्यांचे निकाल घोषित झाले नाही. विद्यार्थ्यांनी निकाल जाहीर करण्याची मागणी केली; परंतु विद्यापीठाने याला नकार दिला. याची चाचपणी केली असता विद्यापीठाने अनेक अभ्यासकेंद्रांवर पात्रता नसलेल्या विद्यार्थ्यांनादेखील प्रवेश दिला होता. सोबतच कोरोना संसर्गाचे कारण देत त्यांना परीक्षा देण्याची परवानगीदेखील दिली होती.
परीक्षा नियंत्रकांचा दावा, कुठलीच गडबड नाही
यासंदर्भात कुलगुरू डॉ. ई. वायूनंदन यांना संपर्क केला असता त्यांनी या प्रकाराची कुठलीच माहिती नसल्याचे स्पष्ट केले. त्यांनी परीक्षा नियंत्रक डॉ. बी. पी. पाटील यांच्याशी चर्चा केली. अनेक विद्यार्थ्यांनी प्रवेशादरम्यान आवश्यक कागदपत्रे दिली नव्हती. त्यामुळे त्यांचे निकाल थांबविण्यात आले आहेत. प्रवेशप्रक्रियेत कुठलीही गडबड झालेली नाही, असा दावा परीक्षा नियंत्रकांनी केला. प्रकरणाची चौकशी झाली आहे की नाही याबाबतदेखील त्यांनी काहीच उत्तर दिले नाही.