नागपूर : सराफांना हॉलमार्किंगचे दागिने विकण्याचे बंधन आल्यानंतर त्यांच्याकडील जुन्या दागिन्यांच्या स्टॉकची माहिती एकत्रित करण्याच्या उद्देशाने भारतीय मानक ब्युरोने (बीआयएस) नागपूर जिल्ह्यातील नोंदणीकृत ८४१ सराफांना नोटिसा पाठविल्या असून त्यांना ३१ जुलैपर्यंत उत्तर द्यायचे आहे. बीआयएसला नोटिसा पाठविण्याचा अधिकार आहे का, असा सवाल करीत सराफांनी नोटिसाबाबत तीव्र नाराजी व्यक्त करीत शासन स्तरावर विरोध करणार असल्याचे सांगितले.
नोटिसाला उत्तर देणार नसल्याचे सराफांनी म्हटले आहे, तर दुसरीकडे बीआयएसने स्टॉकची माहिती देणे बंधनकारक असल्याचे नोटिसात म्हटले आहे. ३१ जुलैपर्यंत सराफांनी माहिती न दिल्यास आणि हॉलमार्किंग नसलेले जुने दागिने सराफांकडे आढळून आल्यास कठोर कारवाई करण्याचे संकेत बीआयएसने दिले आहेत. त्यामुळे सराफा आणि बीआयएसमध्ये वाद वाढणार आहे.
नोटिसांचा विरोध करणार
हॉलमार्किंगच्या नियमांसाठी स्थानिक स्तरावर बैठका झाल्या आहेत. बीआयएसला माहिती मागण्याचा अधिकार नाही, शिवाय सराफही माहिती न देण्यावर ठाम आहेत. सराफा व्यापारी वजनाच्या हिशेबात स्टॉक ठेवतात. दागिन्यांचा स्टॉक देणे कुणालाही शक्य नाही. देशात ५ लाखांपैकी केवळ ५५ हजार सराफांनी बीआयएसकडे नोंदणी केली आहे. याचप्रकारे नागपुरात ३ हजारांपैकी केवळ ८४१ जणांनी नोंदणी केली आहे. इमानदारीने व्यवसाय करणाऱ्यांना नोटिसा देण्यात येत असून नोंदणी न करणारे मजेत आहेत.
राजेश रोकडे, सचिव, नागपूर सराफा असोसिएशन.
आदेशानुसार सराफांना नोटिसा
मंत्रालयाकडून आलेल्या आदेशानुसार सराफांकडे उपलब्ध जुन्या दागिन्यांचा स्टॉक मागविण्यासाठी सराफांना नोटिसा पाठविण्यास येत आहेत. १२ जुलैला आदेश आल्यानंतर बीआयएसकडे नोंदणीकृत ८४१ सराफांना नोटिसा मेल, व्हॉट्सअॅप आणि मानक ऑनलाईन पोर्टलद्वारे पाठविण्यात आल्या आहेत. नोटिसाचे उत्तर ३१ जुलैपर्यंत पाठवायचे आहे. उत्तर न दिलेल्या सराफांवर कारवाई होणार वा नाही, हे नंतरच कळणार आहे. आम्ही मंत्रालयाच्या आदेशाचे पालन करीत आहोत.
विजय नितनवरे, वैज्ञानिक-ई अॅण्ड प्रमुख, बीआयएस.