नागपूर : काँग्रेसच्या प्रदेश प्रतिनिधींच्या यादीत स्थान मिळालेल्या माजी मंत्री नितीन राऊत व सतीश चतुर्वेदी यांच्या समर्थकांनी बुधवारी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांची भेट घेतली. ज्यांनी सदस्य नोंदणी देखील केली नाही, अशांची नावे प्रदेश प्रतिनिधींच्या यादीत आहेत. एकाच घरातील दोन व्यक्तींना स्थान देण्यात आले आहे. त्यामुळे ही यादी रद्द करावी व पक्षाच्या संघटनात्मक निवडणुकांची प्रक्रिया पूर्ण करावी, अशी मागणी केली.
माजी विरोधी पक्षनेते तानाजी वनवे, माजी आ. अशोक धवड, संजय दुबे, नरेंद्र जिचकार, कृष्णकुमार पांडे, कमलेश समर्थ, नितीन कुंभलकर, आदींनी पटोले यांची भेट घेतली. वनवे म्हणाले, प्रदेश प्रतिनिधीच्या यादीत काँग्रेसच्या एका गटाला झुकते माफ देण्यात आल्याचे दिसत आहे. त्यामुळे आपण प्रदेशाध्यक्ष म्हणून सर्वांना सामावून घेणारी संतुलित यादी तयार करावी. ते शक्य नसेल तर निवडणुका होऊ द्या. महापालिकेच्या निवडणुका तोंडावर आहेत. त्या निवडणुकांवर या सर्व घटनाक्रमाचा परिणाम होऊ नये. आपल्याकडे दाद मागितल्यानंतरही समाधान झाले नाही तर आम्ही पुढे हायकमांडकडे न्याय मागू. हायकमांडनेही ऐकले नाही तर सर्वांची बैठक घेऊन पुढे काय करायचे ते ठरवू, अशी स्पष्ट भूमिका या गटाने पटोले यांच्यासमोर मांडली. यावर पटोले यांनी आपण स्वत: संबंधित डीआरओ व एपीआरओ यांच्याशी चर्चा करू व सर्वसमावेशक असा निर्णय घेऊ, असे आश्वस्त केले.
म्हणून चतुर्वेदी, धवड यांची नावे नाहीत !
माजी मंत्री सतीश चतुर्वेदी यांचे पुत्र दुष्यंत चतुर्वेदी हे शिवसेनेकडून आमदार झाले आहेत. चतुर्वेदी यांनी त्यांचे समर्थक माजी नगरसेवक दीपक कापसे यांच्यासह कार्यकर्त्यांना शिवसेनेत पाठवून दिले आहे, तर माजी आ. अशोक धवड यांच्यावर नवोदय बँकेतील अपहार प्रकरणाचा ठपका आहे. या प्रकरणात त्यांना शिक्षाही झाली आहे. त्यामुळे चतुर्वेदी व धवड यांचे नाव येऊ शकले नाही, असे काँग्रेसच्या दुसऱ्या गटाचे म्हणणे आहे.