लोकमत न्यूज नेटवर्क, नागपूर : समग्र शिक्षा अंतर्गत राष्ट्रीय आविष्कार अभियान २०२२-२३ या उपक्रमाअंतर्गत एक्सपोजर व्हिजिट आऊटसाईड स्टेट या कार्यक्रमांतर्गत जिल्हा परिषदेच्या शाळांतील २० विद्यार्थी बुधवारपासून गुजरात दौऱ्यावर जात आहेत. यादरम्यान विद्यार्थी जगप्रसिद्ध स्टॅच्यू ऑफ युनिटी व स्पेस सेंटर तसेच गुणवत्तापूर्ण शाळांनाही भेटी देणार आहेत.
१ मार्चला हे विद्यार्थी सकाळी ८ च्या प्रेरणा एक्स्प्रेस रेल्वेने गुजरातला जाणार आहेत. १ ते ५ मार्च २०२३ पर्यंतच्या या अभ्यास दौऱ्यासाठी जिल्ह्यातील सर्वाधिक पटसंख्या असलेली व शासनाच्या आदर्श शाळा योजनेत निवड झालेल्या जि.प.च्या चनकापूर शाळेतील प्रत्येकी ५ मुले व मुली तसेच गुणवत्तापूर्ण शिक्षण देणारी, २ वर्षांत दुपटीने पट वाढविणारी आणि राज्यस्तरावर शाळेची स्वतंत्र यशोगाथा प्रकाशित झालेली नरखेड तालुक्यातील थुगाव जि. प. शाळेतील १० असे एकूण २० विद्यार्थी या शैक्षणिक सहलीला जाणार आहे
सोबतच अभ्यासगट प्रमुख व या शैक्षणिक दौऱ्याची जबाबदारी असलेले शिक्षण विभागातील समग्र शिक्षा अभियानाचे सहायक कार्यक्रम अधिकारी प्रमोद वानखेडे जाणार आहेत. विद्यार्थी गुजरातच्या नर्मदा जिल्ह्यातील प्रसिद्ध स्टॅचू ऑफ युनिटीसह साबरमती आश्रम, अक्षरधाम, विक्रम साराभाई स्पेस सेंटर, इतर ऐतिहासिक वास्तू आणि गुणवत्तापूर्ण शाळांना भेटी देतील.
सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा महाराष्ट्रातील अव्वल मराठी वेबसाईट "लोकमत डॉट कॉम"