लाेकमत न्यूज नेटवर्क
केळवद : स्थानिक गुन्हे शाखा व केळवद पाेलिसांच्या संयुक्त पथकाने दाढेरा शिवारातील माेहफुलाच्या दाेन दारूभट्ट्यांवर शुक्रवारी (दि. ३) सायंकाळी धाडी टाकल्या. यात दाेन्ही दारूभट्ट्या उद्ध्वस्त केल्या. शिवाय, दाेघांविरुद्ध गुन्हा नाेंदविला असून, एकूण ६ लाख ७४ हजार ३०० रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त केला.
दाढेरा (ता. कळमेश्वर) शिवारात माेहफुलाची दारू काढली जात असल्याची माहिती स्थानिक गुन्हे शाखेला मिळाली हाेती. त्यामुळे स्थानिक गुन्हे शाखेच्या अधिकाऱ्यांनी केळवद पाेलिसांच्या मदतीने या शिवाराची पाहणी केली. यात त्यांना दाेन दारूभट्ट्या आढळून आल्या. पाेलिसांना पाहताच दारू काढणाऱ्यांनी पळ काढला. पाेलिसांनी त्यांचा पाठलाग केला; पण दाेघांनाही पकडण्यात त्यांना यश आले नाही. या पथकाने दाेन्ही दारूभट्ट्या नष्ट केल्या.
या कारवाईमध्ये ५ लाख ४० हजार रुपये किमतीचा ५,४०० लिटर माेहफुलाचा सडवा, ६० हजार रुपयांची ३०० लिटर माेहफुलाची दारू व दारू काढण्याचे साहित्य असा एकूण ६ लाख ७४ हजार रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त केला, अशी माहिती स्थानिक गुन्हे शाखेचे पाेलीस निरीक्षक अनिल जिट्टावार यांनी दिली. या प्रकरणात अमित चंद्रपाल राजपूत व सूर्यपाल चंद्रपाल राजपूत (दाेघेही रा. तिडंगी, ता. कळमेश्वर) यांच्या विराेधात गुन्हा नाेंदविण्यात आल्याचे त्यांनी सांगितले.
या प्रकरणी केळवद पाेलिसांनी गुन्हा नाेंदवून तपास सुरू केला आहे. ही कारवाई ठाणेदार राहुल साेनवणे, स्थानिक गुन्हे शाखेचे राजेंद्र रेवतकर, आशिष मुंगळे, किशाेर वानखेडे, नम्रता बघेल, केळवद ठाण्याचे रवींद्र चटप, धाेंडूतात्या देवकते, श्रीधर कुळकर्णी, सचिन येळकर, राहुल खरबडे यांच्या पथकाने केली.